Raj and uddhav thackeray -मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले आणि उद्धव व राज ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. दोन भावंडांच्या या सतत होणार्या भेटीमुळे आता त्यांची मुंबई पालिकेसाठी युती होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
आज उबाठा खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला उद्धव व राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. गेल्या काही महिन्यांतील ही ठाकरे बंधूंची पाचवी भेट आहे.
मुंबईच्या वांद्रे येथील एमसीए क्लबमध्ये संजय राऊत यांच्या मुलीच्या मुलाचा बारशाचा सोहळा पार पडला. या कौटुंबिक कार्यक्रमात दोघे ठाकरे बंधू सहकुटुंब एकत्र आले. राज ठाकरे यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, तर उद्धव ठाकरेंसोबत रश्मी आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे अनेक नेते देखील उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू त्या कार्यक्रमातून बाहेर पडले. त्यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना हस्तांदोलन करून
निरोप घेतला.
मात्र, या भेटीनंतर राज ठाकरे शिवतीर्थवर न जाता थेट मातोश्रीवर गेले. दोघे भाऊ सतत भेटत आहेत . मात्र त्यांच्या युतीची घोषणा अजून झालेली नाही. राज ठाकरे दसरा मेळाव्याला गेले नाहीत. उद्धव ठाकरे हे अलीकडे राज ठाकरे यांच्या घरी गेले तेव्हा मावशीला भेटायला गेलो होतो असे त्यांनी सांगितले होते. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल हे दोघांकडून सुचवले जात असले तरी हे राजकारण आहे हे लक्षात घेता त्यांची युती होणार हे स्पष्ट असूनही प्रत्यक्ष घोषणा होत नाही तोवर या भावांच्या एकत्र येण्याबाबत सामान्यांच्या मनात संभ्रम कायम राहणार आहे.
हे देखील वाचा –
मारहाण प्रकरणी अनिल परब यांच्यावर आरोप निश्चिती