सैन्य व पोलीस भरतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक


नवी दिल्ली- सैन्यात व पोलीस दलात भरतीसाठी प्रशिक्षण व आश्वासन देणाऱ्या युट्यूब व्हिडियो द्वारे देशातील शेकडो युवकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अरविंद पांडे व त्याची महिला सहाय्यक यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे भारतीय पुलिस प्रोटेक्शन फोर्स नावाचे संकेतस्थळही बंद करण्यात आले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
अरविंद पांडे नावाच्या या इसमाने दिल्लीच्या किशनी चौराहा या ठिकाणी पोलीस भरतीसाठीचे एक प्रशिक्षण केंद्र सुरु केले. त्यानंतर त्याने युट्युबवर व्हिडियो टाकूनही युवकांना या प्रशिक्षणासाठी आकर्षित केले. त्याच्या विरोधात तेलंगणा येथील अशोक कुमार या तरुणाने तक्रार दाखल केली. पांडेने सैन्यात भरती करण्याच्या नावाखाली तो व त्याच्या इतर सहकाऱ्यांकडून प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपये घेतल्याचा आरोप त्याने केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता, त्याने देशातील जवळजवळ चारशे युवकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्याला व त्याची सहाय्यक सुमित्रा सेनापती या दोघांना अटक करण्यात आली. एखाद्या मंत्र्याच्या दालनात बसून सोबत वरिष्ठ अधिकारी असल्याचे दाखवणारे व्हिडियो तो टाकत असे. त्याचे संकेतस्थळ पोलिसांनी बंद केले असले तरी त्याचे युट्युबवर अद्यापही दोनशे व्हिडियो असून युवकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.