AI Video Ban in Bihar Election Campaign: निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणुकीच्या प्रचारात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून तयार केलेल्या व्हिडिओंवर बंदी घातली आहे. कोणत्याही उमेदवाराला किंवा पक्षाला आता प्रतिस्पर्धकांविरुद्ध प्रचार करण्यासाठी AI-निर्मित व्हिडीओचा वापर करता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी AI वर बंदी
राजकीय प्रचारात एआयचा गैरवापर टाळणे आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुकासुनिश्चित करणे हा या बंदीमागचा मुख्य उद्देश आहे, असे आयोगाने म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश अत्यंत महत्त्वाचे आहेत. बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार असून, 14 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
निवडणूक आयोगाने सर्व उमेदवारांना सूचित केले आहे की, हे निर्देश बंधनकारक आहेत आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. AI चा वापर करून तयार केलेले कोणतेही सिंथेटिक किंवा बनावट माध्यम आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल.
प्रचारात कशावर बंदी आणि काय बंधनकारक?
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, AI टूल्सचा वापर करून माहितीमध्ये फेरफार करणे किंवा सोशल मीडियावर दिशाभूल करणारी सामग्री पसरवणे टाळण्याचे आवाहन राजकीय पक्षांना करण्यात आले आहे.
राजकीय भाष्य करताना केवळ प्रतिस्पर्धी पक्षांचे धोरण, कार्यक्रम, मागील रेकॉर्ड आणि सार्वजनिक कृती यावर टीका करण्याची परवानगी आहे. नेत्यांच्या खासगी आयुष्यावर किंवा सार्वजनिक कार्याशी संबंधित नसलेल्या बाबींवर टीका करणे टाळावे लागेल.
तसेच, राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर प्रचारासाठी वापरलेली कोणतीही AI-निर्मित सामग्री, जसे की डीपफेक, स्पष्टपणे लेबल करणे अनिवार्य आहे. यासाठी ‘AI-निर्मित’, ‘डिजिटल फेरफार’ किंवा ‘सिंथेटिक कंटेंट’ असे शब्द ठळकपणे नमूद करावे लागतील.
पक्षांनी खोटे आरोप करणे किंवा विकृत तथ्यांवर आधारित टीका करणे टाळणे बंधनकारक आहे.
निवडणूक आयोगाने सोशल मीडिया पोस्ट्सवर कडक लक्ष ठेवण्याची व्यवस्था केली आहे. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा – सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट; म्हणाले…