Ahmedabad Plane Crash: DGCA चा मोठा निर्णय, बोईंग विमानांमधील इंधन स्विच तपासणी बंधनकारक

Ahmedabad Plane Crash

DGCA Boeing Inspection | अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतातील सर्व बोईंग 737 आणि 787 विमानांमधील इंधन स्विचची तातडीने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. AAIB च्या अपघाताशी संबंधित प्राथमिक अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

DGCA ने सर्व एअरलाइन ऑपरेटरांना 21 जुलै 2025 पर्यंत इंजिन इंधन स्विचची तपासणी पूर्ण करण्याचे सांगितले आहे. याशिवाय, विमान आणि इंजिनातील महत्त्वाच्या घटकांमध्ये आवश्यक बदल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेषतः बोईंग 737 आणि 787 ड्रीमलाइनर मॉडेल्सवर हे लागू आहे, ज्यामध्ये इंधन स्विचच्या लॉकिंग फीचरमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद विमान अपघाताचे कारण

AAIB च्या प्राथमिक अहवालानुसार, अपघाताच्या वेळी विमानाच्या दोन्ही इंजिनांनी काही सेकंदांत इंधन कटऑफ झाले. इंधन स्विचमधील त्रुटीमुळे अपघात झाला का याचाही तपास केला जात आहे. टेक-ऑफनंतर 180 नॉट्स वेग गाठल्यानंतर इंजिन बंद पडल्याने विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. या घटनेत 241 प्रवासी आणि 19 जमिनीवरील लोकांचा मृत्यू झालाहोता.

विमानाचे अवशेष तपासासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून, इंजिनचे विश्लेषण सुरू आहे. एअर इंडियाने 2019 आणि 2023 मध्ये इंधन स्विच बदलले होते. पण AAIB च्या मते, हे बदल कोणत्याही दोषाशी संबंधित नव्हते. FAA च्या 2018 च्या सल्ल्याची तपासणी एअर इंडियाने न केल्याने हा धोका वाढला. बोईंगने या स्विचला सुरक्षित मानले असले तरी, DGCA च्या नव्या नियमांमुळे विमान सुरक्षा मजबूत होण्याची अपेक्षा आहे.