Home / देश-विदेश / Donald Trump vs Giorgia Meloni: ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधानांमध्ये जुंपली! जुन्या मित्रांमध्ये जाहीरपणे शाब्दिक युद्ध

Donald Trump vs Giorgia Meloni: ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधानांमध्ये जुंपली! जुन्या मित्रांमध्ये जाहीरपणे शाब्दिक युद्ध

Donald Trump vs Giorgia Meloni: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात जाहीरपणे शाब्दिक युद्ध सुरू झाले...

By: Team Navakal
Donald Trump vs Giorgia Meloni: ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधानांमध्ये जुंपली! जुन्या मित्रांमध्ये जाहीरपणे शाब्दिक युद्ध
Social + WhatsApp CTA

Donald Trump vs Giorgia Meloni: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात जाहीरपणे शाब्दिक युद्ध सुरू झाले असून, एकेकाळी जवळचे मित्र मानल्या जाणाऱ्या या दोन नेत्यांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या वादामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा रंगली आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर मेलोनी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. फ्रान्समधील G7 शिखर परिषदेदरम्यान मेलोनी यांनी आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी वारंवार विनवणी केली होती, असा दावा ट्रम्प यांनी केला. यावर मेलोनी यांनी ट्रम्प यांचे आरोप पूर्णपणे बनावट असल्याचे सांगत, “इटली आणि मी कोणाकडेही भीक मागत नाही”, अशा कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

इराण युद्धाचा संदर्भ; ट्रम्प यांनी काढली जुनी खुन्नस

डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ फोटोवरूनच नाही, तर इराण युद्धादरम्यान इटलीने घेतलेल्या भूमिकेवरूनही मेलोनी यांच्यावर टीका केली आहे:

  • धावपट्टी वापरण्यास नकार: इराणमधील लष्करी मोहिमेदरम्यान इटलीने अमेरिकन सैन्याला आपल्या हवाई पट्ट्या आणि धावपट्ट्या (रनवे) वापरू दिल्या नव्हत्या, ज्यामुळे अमेरिकेची मोठी लॉजिस्टिक कोंडी झाली होती, असा आरोप ट्रम्प यांनी केला.
  • आर्थिक व लोकप्रियतेचा दावा: अमेरिकेने इराणवर लष्करी विजय मिळवल्यानंतर आता मेलोनी आपली घसरलेली लोकप्रियता सुधारण्यासाठी पुन्हा वॉशिंग्टनशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला ट्रम्प यांनी लगावला.

“माझी लोकप्रियता तुमच्यावर अवलंबून नाही”; मेलोनींचे चोख उत्तर

ट्रम्प यांच्या या आरोपांना जॉर्जिया मेलोनी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अत्यंत सडेतोडपणे उत्तर दिले आहे:

मेलोनी यांनी ट्रम्प यांचे आरोप मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. “तुमचा मित्र बनल्याने माझी लोकप्रियता वाढलेली नाही आणि ती तुमच्याशी असलेल्या संबंधांवर अजिबात अवलंबून नाही. माझी लोकप्रियता इटलीच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याच्या माझ्या क्षमतेवर अवलंबून आहे”, असे मेलोनी यांनी सुनावले.

ट्रम्प यांच्यावर उलटवार करताना मेलोनी म्हणाल्या की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या मित्रांवर आणि मित्रदेशांवर हल्ले करतात, परंतु पाश्चात्त्य देशांच्या खऱ्या शत्रूंसोबत आणि विरोधी नेत्यांसोबत मात्र ते अतिशय मवाळपणे वागतात, ही शरमेची बाब आहे.

इटलीमध्ये संतापाची लाट; परराष्ट्रमंत्र्यांचा अमेरिका दौरा रद्द

ट्रम्प यांच्या या विधानांमुळे इटलीच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो तायानी यांनी ट्रम्प यांचे वक्तव्य इटलीचा अपमान करणारे असल्याचे सांगत आपला नियोजित अमेरिका दौरा तात्काळ रद्द केला आहे. याशिवाय मियामी येथे होणारा एक महत्त्वाचा बिझनेस फोरम देखील इटलीने रद्द केला आहे.

इटलीचे संरक्षण मंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांनीही मेलोनी यांच्या पाठीशी उभे राहत ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनीही मेलोनी यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. युक्रेन, व्यापार, गाझा संघर्ष आणि इराण या मुद्द्यांवरून या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय मैत्री आता पूर्णपणे धोक्यात आल्याचे दिसत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या