PM Kisan 23rd Instalment: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्र सरकारच्या अत्यंत लोकप्रिय ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ म्हणजेच पीएम-किसान योजनेचा 23 वा हप्ता अधिकृतपणे जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून थेट बटण दाबून देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैशांचे वाटप सुरू केले आहे.
विशेष म्हणजे, भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 79 वर्षांत पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी या राज्याच्या भूमीवरून देशातील अन्नदात्यांना ही मोठी आर्थिक भेट दिली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2,000 रुपयांची रक्कम जमा केली जात आहे.
तुमच्या खात्यात पैसे आले की नाही? ‘असे’ तपासा ऑनलाइन स्टेटस
शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी अधिकृत पोर्टलवर सुविधा देण्यात आली आहे. खालील 5 सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता:
- स्टेप 1: सर्वप्रथम पीएम-किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला (pmkisan.gov.in) भेट द्या.
- स्टेप 2: होमपेजवर स्क्रोल करून ‘फार्मर्स कॉर्नर’ या पर्यायाखाली असलेल्या ‘अपनी स्थिति जानें’ (Know Your Status) या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 3: नवीन पेज उघडल्यानंतर तिथे तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि स्क्रीनवर दिसणारा सुरक्षा कोड (Captcha Code) प्रविष्ट करा.
- स्टेप 4: त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) पाठवला जाईल.
- स्टेप 5: तो ओटीपी पोर्टलवर टाकून सबमिट करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर 23 व्या हप्त्याचे संपूर्ण पेमेंट स्टेटस तपशीलासह दिसेल.
घरबसल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सामायिक सेवा केंद्रावर जाऊन शेतकरी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात आणि आपले नाव लाभार्थी यादीत असल्याची खात्री करू शकतात.










