Iran Israel War: इराणमधील राजकीय परिस्थितीत मोठी उलथापालथ झाली असून, दिवंगत अयातुल्ला अली खामेनी यांचा मुलगा मोजताबा खामेनी यांची देशाचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे.
‘इराण इंटरनॅशनल’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या शक्तिशाली ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ने ५६ वर्षीय मोजताबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
सत्तांतराचा नवा वाद आणि आयआरजीसीचा दबाव
मोजताबा खामेनी यांची निवड ही इराणच्या राजकारणातील एक संवेदनशील वळण मानली जात आहे. इराणने नेहमीच घराणेशाहीच्या राजवटीवर टीका केली असून स्वतःला राजेशाहीचा पर्याय म्हणून सादर केले आहे.
मात्र, वडिलांनंतर मुलाकडेच सत्ता सोपवल्यामुळे इराणच्या या तत्त्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. असे म्हटले जात आहे की, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) मोजताबा यांच्या निवडीसाठी धार्मिक नेत्यांच्या गटावर प्रचंड दबाव टाकला होता.
मोजताबा खामेनी कोण आहेत?
मोजताबा हे अली खामेनी यांचे दुसरे चिरंजीव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यामागून सत्ता सांभाळत असल्याचे बोलले जाते. ते एक मध्यम श्रेणीतील धर्मगुरू असून त्यांनी इराण-इराक युद्धादरम्यान लष्करामध्ये सेवा दिली आहे. ‘रिव्होल्युशनरी गार्ड’शी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध असून लष्करी आणि आर्थिक क्षेत्रांत त्यांचा मोठा प्रभाव आहे. अनेक विश्लेषकांच्या मते, मोजताबा हेच इराणच्या सत्तेचे खरे सूत्रधार आहेत.
सर्वोच्च नेत्याची ताकद
इराणच्या व्यवस्थेत सर्वोच्च नेत्याकडे अंतिम अधिकार असतात. ते देशाच्या सशस्त्र दलांचे आणि रिव्होल्युशनरी गार्डचे सरसेनापती असतात. सरकारी धोरणांपासून ते लष्करी निर्णयांपर्यंत सर्व महत्त्वाच्या बाबींवर त्यांचाच शब्द अंतिम असतो. पश्चिम आशियात सध्या सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, मोजताबा खामेनी आता इराणची धुरा कशी सांभाळतात आणि इस्रायल-अमेरिकेला कसे प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.










