Nashik Neet Paper Leak : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि सुमारे २२ लाख २९ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणात आता एक अत्यंत खळबळजनक खुलासा झाला आहे. या पेपरफुटीची पहिली ठिणगी नाशिकमध्ये पडली असून, येथूनच पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने ३० वर्षीय संशयित शुभम खैरनार याला अत्यंत नाट्यमयरीत्या अटक केली आहे.
ओळख लपवण्यासाठी केले टक्कल; असा रंगला अटकेचा थरार-
राजस्थान सीबीआय आणि पोलिसांनी दिलेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा युनिट २ ने ही मोठी कारवाई केली. शुभम खैरनार हा मूळचा नांदगावचा रहिवासी असून तो नाशिकमध्ये बी.ए.एम.एस. (BAMS) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. तपासादरम्यान पोलिसांना त्याचे नाव समजले होते, मात्र त्याच्या वास्तव्याचा नेमका पत्ता उपलब्ध नव्हता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून शुभमने चक्क आपले डोक्याचे पूर्ण केस कापून टक्कल केले होते आणि पेहरावही बदलला होता. मंगळवारी तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी सापळा रचला. नवीन रूपामुळे सुरुवातीला तो ओळखू आला नाही, मात्र पोलीस अंमलदारांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याला शिताफीने ओळखले आणि अवघ्या एक तासात त्याला जेरबंद केले.
१० लाखांचा पेपर १५ लाखांना विकला; व्यवहाराचे धक्कादायक वास्तव-
तपासातील प्राथमिक माहितीनुसार, १ मे रोजीच ही प्रश्नपत्रिका लीक झाली होती. शुभम खैरनार याने साधारणतः १० लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि पुढे ती १५ लाख रुपयांना विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारांनंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाली, ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले.
नाशिक ते हरियाणा: पेपरफुटीचा प्रवास-
नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची पहिली प्रत नाशिकमध्ये फुटली आणि तिथून ती हरियाणात पोहोचली. हरियाणात या प्रश्नपत्रिकेचे १० वेगवेगळे संच तयार करण्यात आले आणि त्यानंतर ही साखळी बिहार, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पसरली. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून १६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, राजस्थानचा ‘मनीष’ हा या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जात आहे.
लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी-
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ३ मे रोजी झालेली परीक्षा अधिकृतपणे रद्द केली असून, फेरपरीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. जरी विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र तेच राहणार असले आणि त्यांना नवीन प्रवेशपत्र दिले जाणार असले, तरी काही मोजक्या व्यक्तींच्या आर्थिक हव्यासापोटी प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेचा ताण आला आहे.









