Israel India Relations: इस्रायलचा सर्वात जवळचा आणि शक्तिशाली मित्र अमेरिका असला, तरी तो एकमेव मित्र नाही, अशा कडक शब्दांत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेला सुनावले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी इस्रायलच्या भूमिकेवर टीका केल्यानंतर नेतान्याहू यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताचा विशेष उल्लेख केला.
नेतान्याहू यांनी काहीशा उपरोधिक शैलीत म्हटले की, व्हाईट हाऊस व्यतिरिक्त इस्रायलचे जगात इतरही अनेक चांगले मित्र आहेत. “आमच्याकडे भारत नावाचा एक मित्रदेश आहे. तिथे 1.4 अब्ज (१४० कोटी) लोक राहतात आणि तिथून आम्हाला प्रचंड मोठा पाठिंबा मिळतो,” असे म्हणत त्यांनी भारतासोबतच्या मजबूत संबंधांची जाहीर कबुली दिली.
जेडी व्हान्स यांनी इस्रायलला नेमके काय म्हटले होते?
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी एका पत्रकार परिषदेत आणि वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इस्रायलच्या लष्करी धोरणावर आणि अमेरिका-इराण करारावरील टीकेवर तीव्र आक्षेप घेतला होता. व्हान्स म्हणाले होते की, सध्याच्या परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प हेच जगात इस्रायलचे एकमेव हितचिंतक आहेत. जर मी इस्रायलच्या मंत्रिमंडळात असतो, तर जगातील आपल्या एकमेव शक्तिशाली मित्रावर (अमेरिका) मी जाहीर टीका केली नसती.
- लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह: इस्रायलची लोकसंख्या केवळ 90 लाख आहे. फक्त लोकांना मारून तुम्ही तुमच्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न कायमचा सोडवू शकत नाही, असे म्हणत त्यांनी इस्रायलच्या रणनितीवर प्रश्न उपस्थित केला होता.
- अमेरिकन करदात्यांचा पैसा: इस्रायलची 2 तृतीयांश संरक्षण शस्त्रे अमेरिकेने बनवली असून त्यासाठी अमेरिकन नागरिकांच्या कराचा पैसा वापरला गेला आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली होती.
“आम्ही सायबर क्षेत्रात जगात नंबर २”; नेतान्याहू यांनी दाखवली इस्रायलची ताकद
उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्याशी वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध असले, तरी त्यांच्या प्रत्येक विधानाशी आपण सहमत नसल्याचे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले. तसेच अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याबाबत नेतान्याहू यांनी खालील मुद्दे मांडले:
- जागतिक नेत्यांचे फोन: अनेक देशांचे नेते मला वैयक्तिक फोन करून इस्रायलच्या लष्करी क्षमतेचे कौतुक करतात आणि सहकार्याची इच्छा व्यक्त करतात.
- तंत्रज्ञानाची मागणी: अनेक देश आमच्याकडून लष्करी डावपेच शिकू इच्छितात, तसेच आमचे एआय (AI) आणि सायबर क्षेत्रातील तंत्रज्ञान मागतात. सायबर सुरक्षेच्या बाबतीत इस्रायल जगात 2 या क्रमांकावर आहे. त्यामुळे पडद्यामागील वास्तव वेगळे आहे.
इराण करार आणि लेबनॉनवरील हल्ल्यांवरून दोन्ही देशांत मतभेद
अमेरिका आणि इस्रायलमध्ये सध्या इराणसोबतचा शांतता करार आणि लेबनॉनमधील लष्करी कारवायांवरून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. जेडी व्हान्स यांनी लेबनॉनमधील हल्ल्यांवरून चिंता व्यक्त केली होती, कारण यामुळे वॉशिंग्टन आणि तेहरानमधील वाटाघाटी बिघडण्याचा धोका आहे. बेरुतमधील नागरी भागात होणाऱ्या स्फोटांमुळे हिजबुल्लाहशी संबंध नसलेल्या निष्पाप लोकांचा जीव जात असल्याबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे व्हान्स यांनी सांगितले.
यावर स्वतःचा बचाव करताना नेतान्याहू म्हणाले की, दक्षिण लेबनॉनमधील ख्रिश्चन गावांनी हिजबुल्लाहच्या कट्टरपंथीयांपासून संरक्षण मिळवण्यासाठी स्वतःहून इस्रायलमध्ये समाविष्ट होण्याची विनंती केली आहे. जर जगात शांतता हवी असेल, तर स्वतःचे रक्षण करण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे, असे सांगत त्यांनी इस्रायलच्या कारवाईचे समर्थन केले.









