PM Modi’s Appeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा, गुजरात येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना देशवासीयांना पुन्हा एकदा काटकसरीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी नागरिकांनी इंधन बचत करावी आणि अनावश्यक खर्च टाळावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले, “मी प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करा. मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करा. कारपूलिंगला प्रोत्साहन द्या, जेणेकरून एकाच वाहनातून अधिक लोक प्रवास करू शकतील.” तसेच, सरकारी आणि खासगी कार्यालयांनी पुन्हा एकदा ‘वर्क फ्रॉम होम’ आणि व्हर्च्युअल मीटिंग्सना प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
सोनं खरेदी आणि परदेशी सहलींना ब्रेक
पंतप्रधानांनी केवळ इंधनच नव्हे, तर इतर आयातीवरही भाष्य केले. भारत दरवर्षी सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन खर्च करतो. त्यामुळे जागतिक परिस्थिती सामान्य होईपर्यंत सोन्याची खरेदी लांबणीवर टाकावी, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, सुट्ट्यांमध्ये परदेशात फिरण्याऐवजी आणि परदेशात ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करण्याऐवजी भारताची पर्यटन स्थळे निवडावीत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर करा लग्नाचे नियोजन
परदेशातील महागड्या लग्नांवर होणारा खर्च वाचवण्यासाठी पंतप्रधानांनी गुजरातच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा पर्याय सुचवला. “तुम्ही आता तुमची लग्ने स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे करण्याचे निश्चित करा. तिथे होणाऱ्या प्रत्येक विवाहाला खुद्द सरदार वल्लभभाई पटेल यांचे आशीर्वाद मिळतील,” असे ते म्हणाले. या ठिकाणी लग्नासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा विकसित केल्या जाव्यात, असेही त्यांनी सुचवले.
‘व्होकल फॉर लोकल’वर भर
परदेशी वस्तूंवर अवलंबून न राहता भारतीयांनी ‘व्होकल फॉर लोकल’ मोहीम अधिक तीव्र करावी, असे आवाहन मोदींनी केले. परदेशी वस्तूंसाठी लाखो कोटी रुपये खर्च करावे लागतात आणि सध्या जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे स्थानिक उद्योगांना पाठबळ देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांचे हे आवाहन अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिका आणि इराणमधील संघर्ष तिसऱ्या महिन्यातही सुरू असून जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे सावट आहे.









