Share Market Crash : जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेचा थेट फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारांमधील पडझडीनंतर, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ८२१ अंकांनी घसरून ७३,४२१ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी ५०’ मध्येही २८६ अंकांची मोठी घसरण नोंदवली गेली, ज्यामुळे तो २३,०८० अंकांच्या पातळीवर खाली आला. बाजारातील या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
या मोठ्या घसरणीचे मुख्य कारण इराण आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा पेटलेला युद्धाचा भडका हे आहे. उभय देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला असून, अमेरिका आणि इराण थेट युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच भीतीपोटी सोमवारी भारतीय बाजारात मोठी घसरण होईल असा अंदाज वर्तवला जात होता, जो दुर्दैवाने खरा ठरला. तत्पूर्वी, सिंगापूरमधील ‘गिफ्ट निफ्टी’च्या फ्युचर्समध्येही घसरण होऊन तो २३,०९६ अंकांवर पोहोचला होता. गिफ्ट निफ्टीच्या या संकेतांमुळेच भारतीय बाजारात आजच्या घसरणीची पूर्वकल्पना मिळाली होती.
केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण आशियाई बाजारात आज मंदीचे सावट पाहायला मिळाले. दक्षिण कोरियाचा ‘कोस्पी’ निर्देशांक सुरुवातीच्या सत्रात तब्बल ७ टक्क्यांनी कोसळला. हाँगकाँगचा ‘हँग सेंग’ १.९२ टक्क्यांनी, तर चीनचा ‘सीएसआय ३००’ निर्देशांक १.५ टक्क्यांनी घसरला. जपानच्या ‘निक्केई २२५’ निर्देशांकालाही मोठा फटका बसला असून त्यात ४.६ टक्क्यांची घसरण झाली. इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिका आणि इराणमधील संभाव्य शस्त्रसंधी आता धोक्यात आली आहे. या हल्ल्यापूर्वी इराणच्या संसदेचे अध्यक्ष एम. बी. घालीबाफ यांनी आरोप केला होता की, अमेरिकन नौदलाकडून केली जाणारी नाकाबंदी आणि लेबनॉनशी संबंधित करारांचे उल्लंघन यामुळे हा संघर्ष अधिक चिघळला आहे.
या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जागतिक इंधन बाजारावर झाला आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा येण्याची भीती निर्माण झाल्याने तेलाचे दर कडाडले आहेत. ‘ब्रेंट क्रूड फ्युचर्स’ ३.१८ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ९६.०५ डॉलर्सवर पोहोचले, तर अमेरिकन ‘वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (WTI) फ्युचर्स’ ३.४६ टक्क्यांच्या वाढीसह ९३.६७ डॉलर्स प्रति बॅरलवर व्यापार करत होते. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढला असून, परिणामी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमालीचा कमकुवत झाला आहे. आज रुपया ३४ पैशांनी घसरून ९५.३२ प्रति डॉलर या पातळीवर खुला झाला.
या सर्व जागतिक घडामोडींदरम्यान, देशांतर्गत आर्थिक आकडेवारीने देखील गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकत्याच जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल केला नसला, तरी आगामी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी महागाईचा अंदाज वाढवून ५.१ टक्के केला आहे. यासोबतच देशाच्या जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) वृद्धीचा दर सुधारून ६.६ टक्के केला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. हा लेख केवळ फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे. यामध्ये आम्ही कोणताही दावा करत नाही.)










