Maharashtra Monsoon Update: गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून अंगाची लाहीलाही करणाऱ्या कडक उन्हामुळे आणि असह्य उकाड्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. सर्वजण चातकासारखी मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत. सध्या मान्सून दक्षिण कोकणात पोहोचला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
परंतु, या सुरुवातीच्या दिलाशानंतर एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असून मान्सूनची पुढील वाटचाल कमालीची मंदावणार आहे. या काळात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी ‘सीएमओ’कडून विशेष काळजीचे आवाहन
मान्सूनची प्रगती लांबणीवर पडल्यामुळे राज्यातील बळीराजासाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे:
- पेरणीची घाई नको: १५ जूनपर्यंत राज्यात कुठेही व्यापक आणि पेरणीला पोषक ठरेल असा पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ पूर्वमोसमी किंवा वादळी पावसावर विसंबून पेरणीची अजिबात घाई करू नये.
- दुबार पेरणीचे संकट टाळा: अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे हवामान विभागाचा अंदाज पाहूनच शेतीची कामे पुढे न्यावीत, असे कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.
- विजांपासून संरक्षण: विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी झाडांखाली, टिनशेडखाली किंवा विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मरजवळ उभे राहणे टाळावे.
विखुरलेल्या सरी आणि कडक ऊन कायम राहणार
सध्याच्या हवामान स्थितीनुसार, १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होऊ शकतो. मात्र, हा पाऊस सर्वदूर नसेल.
दुसरीकडे, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चढलेलाच राहणार आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याचा अंदाज आहे, तर मराठवाड्यात ते 35 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
उर्वरित महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’
पुढील ३ ते ४ दिवसांत दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, राज्यातील इतर बहुतांश भागांमध्ये हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या अंतर्गत काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. नागरिकांनी हवामानातील या बदलाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे देखील वाचा – INDIA Bloc Meeting: दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक; 23 पक्ष एकत्र येणार, जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरणार?










