Uganda General Controversy: युगांडाचे लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे सुपुत्र मुहुझी कैनेरुगाबा यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी थेट तुर्की देशाला लक्ष्य करत 100 कोटी डॉलर्सची नुकसानभरपाई आणि लग्नासाठी त्या देशातील सर्वात सुंदर महिला मागितली आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर 30 दिवसांत तुर्कीचा दूतावास बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नेमका वाद काय?
मुहुझी कैनेरुगाबा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तुर्कीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, युगांडाने सोमालियामध्ये गेल्या दोन दशकांपासून शांतता राखण्यासाठी आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आपले सैन्य तैनात केले आहे. यामुळे सोमालियामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले असून त्याचा फायदा घेत तुर्की तिथे बंदरे आणि विमानतळांच्या माध्यमातून मोठा नफा कमवत आहे.
लष्करप्रमुखांच्या प्रमुख मागण्या:
- सुरक्षा लाभांश: तुर्कीने सोमालियातील व्यवसायातून मिळवलेल्या नफ्यातील 100 कोटी डॉलर्स (1 बिलियन डॉलर्स) युगांडाला द्यावेत.
- अजब मागणी: तुर्कीने त्यांच्या देशातील सर्वात सुंदर महिला लग्नासाठी द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
- अल्टिमेटम: मागण्या मान्य न झाल्यास 30 दिवसांत तुर्कीशी असलेले राजनैतिक संबंध तोडण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
इस्रायलला पाठिंबा आणि जुने वाद
तुर्कीवर टीका करतानाच कैनेरुगाबा यांनी इस्रायलला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. “मी स्वतःच्या नेतृत्वाखाली 1,00,000 युगांडाचे सैनिक इस्रायलच्या संरक्षणासाठी पाठवण्यास तयार आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी 2022 मध्ये त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी लग्न करण्यासाठी चक्क 100 गाईंची ऑफर दिली होती, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची मोठी चर्चा झाली होती.
कैनेरुगाबा हे युगांडाचे भावी अध्यक्ष मानले जातात, मात्र त्यांच्या अशा बेजबाबदार विधानांमुळे युगांडाच्या परराष्ट्र धोरणावर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुर्कीने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.










