Home / देश-विदेश / Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी काय आहे? इराणने हा जलमार्ग बंद केल्याने जागतिक तेल बाजारावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी काय आहे? इराणने हा जलमार्ग बंद केल्याने जागतिक तेल बाजारावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

Strait of Hormuz | अमेरिकेने इराणच्या अणु ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने...

By: Team Navakal
Strait of Hormuz

Strait of Hormuz | अमेरिकेने इराणच्या अणु ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून, भारतासह अनेक देशांवर आर्थिक संकटाचा धोका वाढला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली की, अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणमधील ‘फोर्डो’, ‘नतांझ’ आणि ‘इस्फाहान’ या तीन अणु केंद्रांवर यशस्वी बॉम्ब हल्ले केले. ओव्हल ऑफिसमधून प्रसारित भाषणात ट्रम्प म्हणाले, “इराणची अणु-समृद्धी क्षमता पूर्णपणे नष्ट झाली आहे. ही मोहीम एक शानदार लष्करी यश आहे.” 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिकेने इराणच्या भूभागावर केलेला हा पहिलाच थेट हल्ला आहे.

हल्ल्याच्या काही तासांतच, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नौदलाचे कमांडर ब्रिगेडियर जनरल अलीरेझा तंगसिरी यांनी गंभीर इशारा दिला. “होर्मुझची सामुद्रधुनी काही तासांत बंद केली जाईल,” असे त्यांनी सांगितले. ही सामुद्रधुनी बंद झाल्यास सौदी अरेबिया, इराक, यूएई आणि कुवैत यांसारख्या आखाती देशांची तेल निर्यात ठप्प होईल, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण होईल.

होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व

होर्मुझची सामुद्रधुनी हा पर्शियन गल्फमधील एकमेव सागरी मार्ग आहे, ज्यामधून दररोज सुमारे 20 दशलक्ष बॅरल कच्चे तेल वाहतूक होते. हे जगाच्या एकूण तेल वापराच्या पाचव्या हिस्स्याइतके आहे. यूएस ऊर्जा माहिती प्रशासनानुसार, ही सामुद्रधुनी “जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक अडथळा” आहे. या जलमार्गाचा सर्वात अरुंद भाग फक्त 33 किलोमीटर रुंद आहे.

सामुद्रधुनी बंद झाल्यास कतारचे द्रवीभूत नैसर्गिक वायू (LNG) निर्यातही बाधित होईल, ज्याचा आशिया आणि युरोपवर मोठा परिणाम होईल. पर्यायी तेलवाहिन्या केवळ 2.6 दशलक्ष बॅरल तेल वाहून नेऊ शकतात, जे गरजेच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.

या तणावामुळे ब्रेंट क्रूड तेलाचे दर 90 डॉलर प्रति बॅरलच्या वर, तर WTI तेल 87 डॉलरच्या वर पोहोचले आहे. विश्लेषकांनी इशारा दिला आहे की, सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिल्यास तेलाचे दर 120-150 डॉलरपर्यंत वाढू शकतात. यामुळे ऊर्जा खर्च वाढेल, पुरवठा साखळी मंदावेल आणि जागतिक जीडीपी 1-2% ने कमी होऊ शकतो, ज्यामुळे मंदीचा धोका वाढेल.

भारतावर काय परिणाम होईल?

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्या भारतावरही परिणाम होऊ शकतो. भारत आपल्या 90% कच्च्या तेलाची आयात करतो आणि त्यापैकी 40% होर्मुझमधून येतो, या संकटामुळे अडचणीत येऊ शकतो. सामुद्रधुनी बंद झाल्यास तेल शुद्धीकरण, व्यापार संतुलन आणि इंधन दरांवर परिणाम होईल, ज्यामुळे महागाई वाढेल.

दरम्यान, इस्त्रायलने इराण-संबंधित लक्ष्यांवर सुरू असलेल्या कारवायांनंतर हा संघर्ष तीव्र झाला आहे. 1980-88 च्या इराण-इराक युद्धातही होर्मुझ पूर्णपणे बंद झाली नव्हती, परंतु सध्याच्या परिस्थितीत इराणच्या धमकीने जागतिक चिंता वाढली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या