US Tariffs on Generic Drugs: जागतिक औषध बाजारपेठेत एक मोठी घडामोडी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने प्रचंड आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. औषधांचे उत्पादन अमेरिकेतच व्हावे आणि परदेशी कंपन्यांनी आपले कारखाने अमेरिकेत उभारावेत, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे.
ऑगस्ट 2026 पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार टॅरिफ
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत या नवीन टॅरिफ योजनेची संपूर्ण माहिती दिली:
- पहिले 2 वर्षे (ऑगस्ट 2026 ते 2028): अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर पुढील दोन वर्षांसाठी 0 टक्के आयात शुल्क राहील, म्हणजेच ऑगस्ट 2028 पर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही.
- तिसरे वर्ष (2028 नंतर): तिसऱ्या वर्षी जेनेरिक औषधांवर थेट 100 टक्के टॅरिफ लागू केला जाईल.
- चवथे वर्ष आणि त्यानंतर: दिलेल्या मुदतीत अमेरिकेत उत्पादन प्रकल्प न उभारणाऱ्या कंपन्यांवर 200 टक्के इतका प्रचंड टॅरिफ लादला जाईल.
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय अमेरिकन नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आणि जेनेरिक औषध निर्मिती पुन्हा अमेरिकेत आणण्यासाठी घेण्यात आला आहे. दरम्यान, पेटंट मिळालेली आणि ब्रँडेड औषधांबाबतची जुनी धोरणे जशीच्या तशी कायम राहतील.
भारतीय औषध क्षेत्रावर काय होणार परिणाम?
भारताला जगाची ‘फार्मसी’ म्हणून ओळखले जाते. अमेरिकेतील एकूण जेनेरिक औषधांपैकी जवळपास 40 टक्के औषधांचा पुरवठा एकट्या भारतातून केला जातो.
- मोठी आर्थिक उलाढाल: आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये भारताने अमेरिकेला 9.7 अब्ज डॉलर मूल्याच्या औषधांची निर्यात केली होती, जी भारताच्या जागतिक औषध निर्यातीच्या (25.8 अब्ज डॉलर) तब्बल 38 टक्के इतकी आहे.
- महत्त्वाच्या आजारांची औषधे: अमेरिकेत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मानसिक आजार आणि संसर्गजन्य आजारांवर भारतीय जेनेरिक औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
- गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा: एका अहवालानुसार, अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या 65 टक्के गर्भनिरोधक गोळ्यांचे उत्पादन केवळ ग्लेनमार्क आणि ल्युपिन या दोन भारतीय कंपन्यांद्वारे केले जाते.
भारत-अमेरिका व्यापार कराराचे काय होणार?
फेब्रुवारीमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार करारात जेनेरिक औषधे आणि घटकांबाबत विशेष सवलतींचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ट्रम्प यांच्या या ताज्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांवर या टॅरिफचा किती आणि कसा परिणाम होईल, याबाबत अद्याप पूर्ण अस्पष्टता आहे. जर 200 टक्के टॅरिफ लागू झाला, तर अमेरिकेत भारतीय औषधे महाग होतील किंवा कंपन्यांना तिथेच कारखाने उभारावे लागतील.










