Vijay Thalapathy : तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात २०२६ ची विधानसभा निवडणूक एका मोठ्या सत्तांतराची साक्षीदार ठरली आहे. अनेक दशकांपासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रमुख पक्षांभोवती फिरणारे तामिळनाडूचे राजकारण आता एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. सुपरस्टार विजय थलपती यांच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाने प्रस्थापित राजकीय समीकरणे मोडीत काढत विधानसभेत १०८ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. मात्र, विजयाचा हा आनंद सत्तास्थापनेच्या उंबरठ्यावर येऊन काहीसा विरळ होताना दिसत आहे, कारण राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बहुमताच्या आकड्यावरून तांत्रिक अडसर निर्माण केला आहे.
शपथविधी लांबणीवर पडण्याचे कारण
विजय थलपती यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे नियोजन केले होते, परंतु राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना बहुमतासाठी आवश्यक असलेल्या किमान ११८ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पाठिंबा पत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. २३४ सदस्यसंख्या असलेल्या तामिळनाडू विधानसभेत बहुमताचा जादूई आकडा ११८ आहे. विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकल्या असल्या, तरी ते स्वतः दोन मतदारसंघांतून विजयी झाल्यामुळे त्यांच्या पक्षाचे प्रत्यक्ष संख्याबळ १०७ इतकेच धरले जात आहे. जरी काँग्रेसच्या ५ आमदारांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला असला, तरी ही बेरीज ११२ पर्यंतच पोहोचते. परिणामी, बहुमतासाठी अद्याप सहा आमदारांची कमतरता भासत असल्याने राजभवनाने सावध पवित्रा घेतला आहे.
अण्णाद्रमुकमध्ये बंडाची ठिणगी आणि रिसॉर्ट राजकारण-
या सर्व राजकीय संघर्षात अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या एकूण ४७ आमदारांपैकी तब्बल २८ आमदारांना तातडीने पुद्दुचेरी येथील एका रिसॉर्टवर हलवण्यात आले आहे. माजी मंत्री सी.व्ही. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुकचा एक मोठा गट फुटून विजय यांच्या ‘टीव्हीके’ला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. अण्णाद्रमुकचे ३० हून अधिक आमदार पक्षाबाहेर पडण्यास सज्ज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे आमदार फुटल्यास विजय यांचा बहुमताचा मार्ग सुकर होऊ शकतो, ही भीती ओळखूनच पक्षाने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
निवडणुकीचे अंतिम चित्र-
निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास, टीव्हीके १०८ जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर सत्ताधारी द्रमुकला ५९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अण्णाद्रमुकला ४७ जागा मिळाल्या असून काँग्रेसने ५ जागा जिंकल्या आहेत. इतर लहान पक्ष आणि अपक्षांच्या खिशात ८ जागा गेल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत, जोपर्यंत विजय थलपती अतिरिक्त आमदारांचा पाठिंबा मिळवून राज्यपालांची खात्री पटवून देत नाहीत, तोपर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम राहणार आहे.











