Home / देश-विदेश / Violence : बंगाल निकालानंतर हिंसाचार ! तृणमूल कार्यालयावर बुलडोझर

Violence : बंगाल निकालानंतर हिंसाचार ! तृणमूल कार्यालयावर बुलडोझर

Violence : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतली असतानाच राज्यात हिंसाचार उफाळून आला...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Violence : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतली असतानाच राज्यात हिंसाचार उफाळून आला आहे. त्यात गेल्या 24 तासांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. काल रात्रभर जाळपोळ, तोडफोड याचे सत्र चालू होते. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसचे कार्यालय बुलडोझर लावून पाडण्यात आले. या हिंसाचारावरून भाजपा आणि तृणमूल यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
राज्यात गेल्या 24 तासांत हत्या करण्यात आलेल्यांमध्ये भाजपा आणि तृणमूलचे प्रत्येकी दोन कार्यकर्ते आहेत. उत्तर 24 परगणा आणि हावडा येथे आपल्या दोन कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप भाजपाने तृणमूलवर केला आहे. कोलकाता आणि बीरभूम येथे भाजपा समर्थकांनी आपल्या पक्षाच्या दोन सदस्यांची हत्या केल्याचे तृणमूलने म्हटले आहे.


कोलकात्याच्या न्यू मार्केट परिसरात काल रात्री जमावाने तृणमूल काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावर बुलडोझर चालवून ते पाडले. आसपासच्या दुकानांचेही नुकसान केले. तृणमूल काँग्रेसने या घटनेचा व्हिडिओ एक्सवर शेअर करत लिहिले की, भाजपाचे ‘परिवर्तन’ आले असून, ते बुलडोझरसह आले आहे. आसनसोलच्या कोर्ट मोड भागातील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयातही आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासादरम्यान घटनास्थळावरून बॉम्बने भरलेली एक पिशवीही सापडली. आमतला येथे तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे की, भाजपा समर्थकांनी दगडफेक करून तृणमूलचे पोस्टर-बॅनर फाडले. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंज येथे लेनिन यांचा पुतळा तोडण्यात आला. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखालीच्या बामनघेरी भागात काल रात्री गस्त घालणार्‍या पोलीस आणि केंद्रीय दलांवर हल्ला झाला. आंदोलकांनी गोळीबार केला. त्यात पाच सुरक्षाकर्मी जखमी झाले. जखमींमध्ये नाजाट पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, एक कॉन्स्टेबल, एक महिला पोलीस आणि केंद्रीय दलांचे दोन जवान यांचा समावेश आहे. पोलिसांनी हिंसक घटनांमधील 80 जणांना अटक केली आहे.


तृणमूलच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कोलकातामधील आणि त्यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे  निवासस्थान आणि तृणमूल काँग्रेसचे मुख्यालय येथील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आज हटवण्यात आला आहे. आज या तिन्ही ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. ममता यांच्या निवासस्थानाबाहेरील बॅरिकेडही हटवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, बंगालमध्ये भाजपाचा विजय होताच अनेक दुकानदारांनी आपली दुकाने भगव्या रंगाने रंगवायला सुरुवात केली आहे. दुकानदार दुकानावर जय श्रीराम लिहिलेले भगवे झेंडेही लावत आहेत. अनेक ठिकाणांची नावे बदलणे सुरू झाले आहे. बारासातमधील ऐतिहासिक ‘सिराज उद्याना’चे नाव बदलून ‘शिवाजी उद्यान’ ठेवण्यात आले आहे, तर ‘मस्जिदबारी रोड’च्या कमानीचे आता ‘नेताजीपल्ली रोड’ असे नामकरण करण्यात आले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या