शस्त्रसंधीचा प्रस्ताव कोणी दिला होता? भारत-पाक संघर्षावर विक्रम मिस्त्रींनी संसदीय समितीला दिली माहिती

Foreign Secretary Briefs Parliamentary Panel

Foreign Secretary Briefs Parliamentary Panel | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या लष्करी संघर्षावर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी सोमवारी संसदीय समितीसमोर सविस्तर माहिती दिली.

परराष्ट्र व्यवहार समितीची (Parliament’s Standing Committee on External Affairs) बैठक काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस अभिषेक बॅनर्जी, राजीव शुक्ला, दीपेंद्र हुडा, असदुद्दीन ओवेसी, अपराजिता सारंगी, अरुण गोविल यांच्यासह २४ खासदार उपस्थित होते.

विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानविरोधातील संघर्ष पूर्णपणे पारंपरिक पातळीवर झाला आणि त्यात कोणताही “अण्वस्त्र इशारा” नव्हता. त्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केल्यानंतरच इस्लामाबादशी (Islamabad) थेट लष्करी संवाद साधला.

बैठकीत मिस्री यांनी माहिती दिली की, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव आला होता आणि यामध्ये इतर कोणत्याही देशाची भूमिका नव्हती. या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान १० मे रोजी सर्व प्रकारच्या शत्रुत्वाचे थांबवण्यावर सहमत झाले.

काही खासदारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या मध्यस्थीच्या दाव्याबाबत प्रश्न विचारले. मिस्री यांनी स्पष्ट केले की, भारत आणि अमेरिकेत नियमित चर्चा होत होती, मात्र त्यात कोणतीही मध्यस्थी नव्हती.

एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी पाकिस्तानला संदेश दिल्याचा दावा केला गेला, यावरही चर्चा झाली. मिस्री यांनी सांगितले की लोक “संदर्भाचा गैरसमज” करत आहेत. समितीपुढे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ऑपरेशन सुरू झाल्यानंतरच पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद झाला.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ऑपरेशनदरम्यान भारताने किती विमाने गमावली यावरून जयशंकर यांच्यावर टीका केली होती. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देताना गांधींचे दावे पूर्णतः खोटे असल्याचे म्हटले.

ही विक्रम मिस्री यांची संसदीय समितीपुढील पहिली उपस्थिती होती. तीन तास चाललेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. काही खासदारांनी त्यांच्या कुटुंबावर विशेषतः त्यांची मुलगी दिडोन मिस्री (Didon Misri) यांच्यावर झालेल्या सोशल मीडिया हल्ल्यांचा निषेध केला आणि त्यांना पाठिंबा दिला.

बैठकीनंतर शशी थरूर यांनी सांगितले, “परराष्ट्र सचिवांनी अत्यंत परिपक्वतेने सर्व मुद्द्यांवर माहिती दिली आणि देशासाठी त्यांनी केलेल्या सेवेचे सर्वांनी कौतुक केले.”