Pakistan Drone Target on Golden Temple | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली होती. त्यानंतर पाकिस्तानने 7 ते 8 मे दरम्यान अमृतसरमधील सुवर्ण मंदिर (Golden Temple) आणि पंजाबमधील इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती भारतीय लष्कराने (Indian Army) दिली आहे.
अमृतसर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आणि थेट प्रात्यक्षिकातभारतीय लष्कराने दाखवले की, पाकमधून सोडण्यात आलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने (Indian air defence systems) यशस्वीरित्या निष्प्रभ केली. L-70 एअर डिफेन्स गन्स (L-70 Air Defence Guns) आणि आकाश क्षेपणास्त्र प्रणाली (AKASH missile systems) यांच्या मदतीने सुवर्ण मंदिरासारख्या संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण करण्यात आले.
15 इन्फंट्री डिव्हिजनचे जीओसी मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी सांगितले की, “पाकिस्तानकडे कोणतेही वैध लष्करी लक्ष्य नसल्याने त्यांनी नागरी ठिकाणे व धार्मिक स्थळांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. सुवर्ण मंदिर त्यांच्या मुख्य लक्ष्यांपैकी एक होते, म्हणून आम्ही तेथे उच्चस्तरीय हवाई संरक्षण व्यवस्था तैनात केली होती.”
#WATCH | Amritsar, Punjab: Indian Army shows a demo of how Indian Air Defence systems, including AKASH missile system, saved the Golden Temple in Amritsar and cities of Punjab from Pakistani missile and drone attacks. pic.twitter.com/3HchX0yHJI
— ANI (@ANI) May 19, 2025
8 मेच्या पहाटेपासून पाकिस्तानने ड्रोन व लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी मोठा हवाई हल्ला केला होता. मात्र, भारतीय लष्कराची सज्जता आणि त्वरित प्रतिसादामुळे एकही शस्त्र सुवर्ण मंदिरापर्यंत पोहोचू शकले नाही.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सचिव कुलवंत सिंह मन्नान यांनी हल्ल्याचा निषेध करत सांगितले, “दरबार साहिबसारख्या पवित्र स्थळावर हल्ला करणे कोणत्याही लष्करी कमांडरच्या विचारातही येऊ शकत नाही. हे स्थान श्रद्धेचे केंद्र आहे.”
लष्कराने यावेळी पाडलेले कामिकाझे ड्रोन आणि तुर्की बनावटीचे मायक्रो ड्रोनदाखवले, ज्यात YIHA-III आणि Songar सारखी मॉडेल्स होती. एक लष्करी जवान म्हणाला, “या संपूर्ण हल्ल्यात फक्त 10% दारुगोळ्याचा वापर झाला. आमचे हवाई संरक्षण भेदणे अत्यंत अवघड आहे.”
7 मे रोजी भारताने पाकिस्तानातील मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयावर आणि इतर दहशतवादी तळांवर लक्ष्य केले होते. यानंतर पाकिस्तानने नागरी आणि धार्मिक स्थळांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने ते सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवले.
पँथर डिव्हिजनच्या (Panther Division) जवानांनी सांगितले की, “आता आम्ही शत्रूच्या घरात घुसून प्रत्युत्तर देतो. मनात सूड आणि हृदयात देशभक्ती आहे. ऑपरेशन सिंदूर हा आमचा निर्धार आहे.”
संरक्षण मंत्रालयाच्या14 मेच्या निवेदनानुसार, पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड (integrated counter-UAS grid) आणि हवाई संरक्षण प्रणालीने हे सर्व हल्ले निष्प्रभ केले.
यानंतर भारताने पाकिस्तानमधील हवाई संरक्षण रडार्स आणि लाहोरमधील एक प्रणाली निष्प्रभ केली असल्याचेही सांगण्यात आले.