Women’s Reservation : महिला आरक्षणासाठीचे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत नामंजूर झाले. या विधेयकावर एकूण 528 खासदारांनी मतदान केले. या विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते मिळाली. मात्र, दोन-तृतियांश बहुमताची आवश्यकता असल्याने विधेयक मंजूर होऊ शकले नाही. हे विधेयक फेटाळण्यात आल्यानंतर सरकारने मतदारसंघांची पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिला आरक्षण लागू करणे ही इतर दोन विधेयकेही मागे घेतली. 11 वर्षांच्या कार्यकाळात सभागृहात एखादे विधेयक मंजूर करून घेण्यात अपयशी ठरण्याची ही पहिलीच वेळ असल्याने मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का आहे.
या सुधारित विधेयकांवर लोकसभेत 21 तास चर्चा झाली. एकूण 130 खासदारांनी आपली मते मांडली, ज्यामध्ये 56 महिला खासदारांचा समावेश होता. मतदान सुरू होण्यापूर्वी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले की, आज विरोधी पक्षांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले नाही, तर हे विधेयक नामंजूर होईल. मात्र आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करणारे कोण आहे, हे देशातील महिलांना दिसेल. मोदी जे काही करत आहेत, त्याचे फायदे-तोटे न पाहता त्याला विरोध करायचा, असे विरोधी पक्षाने ठरवले आहे. देशातील माता, भगिनींना आरक्षण मिळणार आहे. परंतु मोदींना याचे श्रेय मिळेल, म्हणूून ते विधेयकाला विरोध करत आहेत. काँग्रेसने देशात महिलांना कधीच संधी दिली नाही.
अमित शहा यांच्या आधी राहुल गांधी यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या निवेदनाची सुरुवात गोष्टी सांगत सुरू केली. लहानपणी आपल्या आजीने आपल्याला अंधारात उभे करून अंधाराला घाबरू नकोस. कारण यातच सत्य लपलेले असते, असा संदेश दिला असे ते म्हणाले. ते बालपणीच्या गोष्टी सांगू लागल्याने सभागृहात चलबिचल सुरू झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत विधेयकाबाबत बोला, असे वारंवार छेडले. त्यानंतर तर राहुल गांधी यांनी जादूगाराची गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. जादूगार स्वत:भोवती साखळ्या गुंडाळून घेतो आणि मग त्यातच अडकून पडतो आणि त्याचे हसे होते ही गोष्ट सांगत त्यांनी जादूगाराची
आणि पंतप्रधान मोदींची तुलना करत म्हटले की, जादूगाराची एक जादू अपयशी झाल्यावर त्याच्या सर्वच जादूंवर लोक हसू लागले.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी भाजपा खासदार भयंकर चिडले. पंतप्रधानांना जादूगार म्हणणे हे योग्य नाही असे म्हणत त्यांनी गदारोळ केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही राहुल गांधी यांना या वक्तव्यावर खडसावण्याचा प्रयत्न केला. पण या सर्वांत राहुल गांधी यांना जो संदेश पोहोचवायचा होता तो पोहोचला. या कारणाने विरोधक खूश झाले होते. आपल्या संदेशाच्या अखेरीस राहुल गांधी म्हणाले की, मतदारसंघाची फेरफार करून हे अन्याय करीत आहेत. महिलांना आरक्षण द्यायचे तर ते आताही देता येईल, पण त्यांचा मूळ उद्देश हा मतदारसंघ फेरफार विधेयक मंजूर करणे हाच आहे आणि त्यात आम्ही त्यांना यश मिळून देणार नाही. या विधेयकात ओबीसी, अल्पसंख्याक यांना प्रतिनिधीत्व देण्याचा भाजपाचा कोणताही विचार नाही. हा अन्याय आम्ही होऊ देणार नाही. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करताना बालाकोटचा जादूगार, सिंदूरचा जादूगार, नोटबंदीचा जादूगार असे शब्द वापरले. यावर आक्षेप घेताना राजनाथ सिंह आणि किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल गांधी हे सैनिकांचा अपमान करीत आहेत. शूर जवानांच्या लढ्याला ते जादूगार म्हणत आहेत. त्या टिकेला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा आणि त्यांच्या नेतृत्वाला वाटते की, ते म्हणजेच भारताची जनता आहे. त्यांना असेही वाटते की, ते म्हणजेच लष्कर आहे. पण ते भारताची जनताही नाहीत आणि सशस्त्र सेनाही नाहीत.
राहुल गांधींनी 16 आकड्याचे कोडे टाकले
राहुल गांधी यांनी आपले निवेदन करताना म्हटले की, काल पंतप्रधान भाषण करत असताना अत्यंत निस्तेज वाटले. त्यांच्यात उत्साहच वाटत नव्हता. हे भाषण ऐकत असताना मी मोबाईलमध्ये पाहिले तेव्हा मला 16 एप्रिल ही तारीख दिसली आणि मला एकदम उलगडा झाला. मी जे बोलतो आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक माहिती माझ्याकडे आहे हे लक्षात घ्या. मी मनात म्हटले की, बापरे 16 क्रमांक आहे. तुमच्या (सत्ताधारी) सर्व समस्यांचे उत्तर 16 क्रमांकात आहे. मी काय बोलतो आहे हे तुम्हाला कळले का? 16 तारखेचे महत्त्व ज्याला कळले असेल त्याने मला संदेश पाठवावा किंवा ट्विट करावे. राहुल गांधी यांच्या विधानामुळे 16 तारखेला काय झाले किंवा काय होऊ शकते यावरच चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी गुगल करून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु 16 एप्रिल या दिवशी महत्त्वाची कोणतीच घटना घडलेली नसल्याने राहुल गांधी यांच्या वाक्याचे गूढ कायम राहिले आहे.
प्रियंका गांधी यांनी हसत टोले लगावले
काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी आज संसदेत बोलताना कडवटपणा किंवा नावे ठेवणे टाळत सत्ताधार्यांना हसत-हसत टोले लगावले..प्रियंका गांधी म्हणाल्या की, तुम्ही सगळे पूर्ण तयारीनिशी आला आहात. आज जर चाणक्य जिवंत असते, तर तेही तुमच्या चलाखीने चकित झाले असते. पंतप्रधान म्हणत आहेत की, त्यांना याचे श्रेय नको आहे. मी म्हणते की, वारंवार फसवणूक करणार्या पुरुषांना महिला ओळखतात. सावध राहा, नाहीतर एकदिवस पकडले जाल. 30 वर्षे हा निर्णय कसा रखडला. सत्ताधारी पक्षातील माझ्या सहकार्यांना हे कदाचित आवडणार नाही, पण याची सुरुवातही नेहरू नावाच्या व्यक्तीनेच केली होती. पण काळजी करू नका, हा तो नेहरू नाही ज्यांना तुम्ही टाळता. मोतीलाल नेहरू यांनी 1928 मध्ये 19 मूलभूत अधिकारांचा अहवाल तयार करून काँग्रेस कार्यकारिणीकडे सादर केला होता. 1931 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात ठराव मंजूर झाला आणि भारतीय राजकारणात महिलांच्या समान हक्कांची सुरुवात झाली. त्याच वेळी एक मत, एक नागरिक, एक मूल्य ही संकल्पना रुजली. अमेरिकेसारख्या देशांना हे हक्क मिळवण्यासाठी अधिक वेळ लागला. हे संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर झाले तर भारतातील लोकशाही संपेल.










