शेअर बाजार आणि अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला जाण्याच्या काही दिवस आधीपासूनच शेअर बाजारात चढउतारांचा खेळ सुरु होतो. यंदाही तो पाहायला मिळाला. गतवर्षीही बजेटच्या साधारणतः 15 दिवस आधी 50 हजारांच्या पातळीपर्यंत गेलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 10-12 दिवसांतच गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे घसरत घसरत 46,500 च्या पातळीपर्यंत खाली आलेला दिसला होता. 2020 चा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच्या महिन्याभरात शेअर बाजारात 1.7 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. चालू वर्षीही 18 जानेवारी रोजी 18,350 च्या पातळीपर्यंत गेलेला निफ्टी 25 जानेवारी रोजी 16800 पर्यंत खालचा स्तर गाठून आता 17350 च्या आसपास रेंगाळत आहे.

वाचा बजेटनंतर सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

आता आपण संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना बाजारात काय होते याचा विचार केल्यास या दिवशी शेअर बाजारात नकारात्मक पडसादच अधिक वेळा उमटल्याचे इतिहासात डोकावल्यास दिसून येईल.

अर्थातच याला अपवाद आहेत. उदाहरणच घ्यायचे गतवर्षी 2021 मध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी निफ्टीमध्ये 5 टक्क्यांची आणि बँक निफ्टीमध्ये 8.3 टक्क्यांची वृद्धी दिसून आली होती. तथापि 2020 मध्ये अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमुळे निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला आणि निफ्टीमध्ये 2 टक्क्यांहून अधिक, तर बँक निफ्टीमध्ये 3.3 टक्क्यांची घसरण झाली होती. 2019 या वर्षात दोन वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यापैकी 5 जुलै रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर निफ्टी 1.1 टक्क्यांनी घसरला होता; तर 1 फेब्रुवारी 2019 रोजी सादर केलेल्या बजेटनंतर 0.6 टक्क्यांची वाढ निफ्टीने नोंदवली होती.

2011 ते 2020 या काळात एकूण सहा वेळा अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजाराने नकारात्मक कौल दिलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर चालू वर्षी बाजार अर्थसंकल्पाकडे कसे पाहतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Scroll to Top