वाहनाचा थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम महाग होणार

नवी दिल्ली – नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाहन विम्याच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ होणार आहे. येत्या १ एप्रिलपासून हे नवे दर लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्रालयाने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. कोरोना महासाथीमुळे दोन वर्षानंतर आता थर्ड पार्टी विमा प्रीमियम लागू होणार आहे.

देशातील 25 विमा कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी विमा नियामक IRDA कडे वाहन विम्याच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, 15 ते 20 टक्के प्रीमियम दरवाढीचा प्रस्ताव मान्य झाल्यास सामान्य ग्राहकांसाठी विमा खूप महाग होईल, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. म्हणून काही प्रमाणात विमा दरात वाढ होईल, असे होईल म्हटले जात होते.

२०१९-२० मध्ये १००० सीसीच्या कारसाठी २०७२ रुपये विमा हप्ता होता. मात्र, तो वाढून आता २०९४ होणार आहे. तसेच १५०० सीसी क्षमतेच्या कारसाठी 3,221 रुपयां ऐवजी 3,416 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. तर, 1500 सीसी क्षमतेवरील कारसाठी 7,890 रुपयांऐवजी 7,897 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.

विमा प्रिमियम फक्त चारचाकीवर वाढणार नसून दुचाकीवरही वाढणार आहे. दुचाकीच्या 150 सीसी ते 350 सीसी क्षमता असणाऱ्या दुचाकीसाठी 1366 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तर 350 सीसीपेक्षा जास्त वाहनांसाठी प्रीमियम 2,804 रुपये असणार आहे.

खासगी इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक दुचाकी आणि हायब्रीड इलेक्ट्रीक वाहनांना सवलत देण्यात आली आहे. प्रस्तावित मसुद्यानुसार, इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांवर 15 टक्के सवलत प्रस्तावित आहे. हायब्रीड वाहनांसाठी 7.5 टक्के सवलत देण्याची प्रस्ताव आहे. पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सवलत देण्यात येणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

Scroll to Top