आर्थिक व्यवहारात गुप्तता; परिवारासाठी धोक्याची!

विनायकराव अचानक गेले आणि त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला. पण त्याहूनही मोठा धक्का त्यांना तेव्हा बसला जेव्हा विनायकरावांचा शेअर ब्रोकर त्यांच्या घरी येऊन किती कंपन्यांचे कोणते शेअर विनायकरावांनी घेऊन ठेवले आहेत याची माहिती देऊ लागला तेव्हा. आपल्याजवळ बाबा कधीच या बाबतीत काही बोलले नाहीत याचं त्यांच्या मुलांना आश्चर्य वाटलं. त्यानंतर त्यांना या संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी काही खटपटी कराव्या लागल्या कारण त्यावर कोणाचंच नामांकन नव्हतं. नाकासमोर नोकरी करणार्‍या विनायकरावांची शेअरमधली रूची पाहून तर त्यांचे नातेवाईकही बुचकळ्यात पडले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी याबाबतीत कोणालाच काही कसं सांगितलं नाही याचं आश्चर्य वाटत होतं.

  • अशी उदाहरणं अनेकदा पाहायला मिळतात. कोणी एखादा प्लॉट किंवा जमिनीचा तुकडा घेऊन ठेवलेला असतो तर कुणाच्या लॉकरमध्ये शेअर्स डिबेंचर्स किंवा दागिने ठेवलेले असतात. कधी बँकेत ठेवी असतात. पण त्यांनी हयातीत याचा उल्लेख कधी केलेला नसतो. त्यांच्या नंतर त्या बँकेकडून किंवा कंपन्याकडून वारसांना या संपत्तीवर दावा करण्यासाठी जेव्हा बोलावलं जातं तेव्हा सगळा उलगडा होतो.
  • मध्यंतरी आलेल्या एका माहितीनुसार विविध बँकात 10 वर्षापेक्षा जास्त काळ कोणीही दावा केलेला नाही अशा अकाउंटमधील रक्कम 2000 कोटींहून अधिक होती. याशिवाय चल आणि अचल संपत्ती किती असेल ज्यावर कोणी कित्येक वर्षात दावाच केलेला नाही याची गणती नाही.
  • या एवढ्या मोठ्या दावा न होणारी संपत्ती निर्माण होण्याचं मुख्य कारण आहे की त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांना त्याची कल्पनाच नसते. कारण हयातीत त्या व्यक्तीने त्याचा उल्लेख त्याने कोणाकडे केलेेला नसतो.
  • आपण संपत्तीचं नामांकन केलं आहे किंवा आपलं मृत्यूपत्र लिहीलं आहे म्हणजे आपल्यानंतर त्याचा विनीयोग होईल अशी अनेकांची समजूत असते. पण त्यात एक महत्वाचा मुद्दा विसरला जातो की या संपत्तीची माहितीच जर वारसदारांना नसेल तर ते त्यावर दावा करणार कसा?
  • पॉलिसीची मुदत संपल्यावर विमा कंपनीकडून त्यावर दावा करण्यासाठी काही पत्रव्यवहार तरी केला जातो पण बँकेतील ठेवी, शेअर्स, कंपन्यातील गुंतवणूक, सरकारी योजनातील गुंतवणूक किंवा एखाद्या जागेत केलेली गुंतवणूक यांच्याकडून वारसदारांना तशी सूचना मिळण्याची काही खात्री नाही. या ठिकाणी संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याची संपत्ती आपणास मिळावी म्हणून वासरदारांनाच दावा करावा लागतो. त्यांनाच जर अशा प्रकारच्या गुुंतवणूकीची माहिती नसेल तर ते दावा करणार कोणाकडे?
    यादृष्टीने काही उपाय करता येतील.
    *मृत्यूपत्र लिहीणे- मृत्यूपत्र लिहीणे ही सोपी गोेष्ट आहे. साध्या कागदावरही ते लिहले जाऊ शकते आणि त्यावर साक्षीदारांच्या सह्या असल्याच पाहिजेत असाही नियम नाही. मात्र ते कोर्टात रजिस्टर करावयाचे असल्यास हे सगळे सोपस्कार पूर्ण करावे लागतात. जवळच्या एखाद्या व्यक्तीला किंवा आपल्या वकीलाला त्याची सत्यप्रत कोठे ठेवली आहे आणि ती आपल्या पश्चात कोणाला द्यावी हे सांगून ठेवावे.
    *पॉवर ऑफ अर्टनी- ही केली असेल तर कोणत्या परिस्थितीत केली आहे, कोणाच्या नावे केली गेली आहे आणि त्याची मूळप्रत कोठे ठेवली आहे याचाही उल्लेख जवळच्या व्यक्तींना करायला हवा.
    *जीवन विमा पॉलिसी- यात संपूर्ण जीवन विमा पॉलिसी, दुर्घटना विमा पॉलिसी यांची मूळ प्रत कुठे आहे, त्याचे नामांकन, मिळणारी रक्कम याचा उल्लेख एका कागदावर करून ठेवावा. त्यावर संबंधित विमा कंपनीचं नाव, एजंटचा नंबर यांचाही उल्लेख असावा म्हणजे वारसदारांना आवश्यक कागदपत्रे गोळा करायला त्रास होत नाही.
    *चल संपत्ती- सगळ्या प्रकारची बँक अकाउंट, फिक्स डिपॉझिट, पीपीएफ, डिमॅट, म्युचुअल फंड, शेअर्स, बॉन्ड यांची माहिती लिहून ठेवावी. जर तुमचा व्यवसाय असेल तर त्याचे उत्तरदायित्त्व कोणाकडे राहिल याचाही उल्लेख करावा.
    पासवर्ड- आजकाल अनेक व्यवहार ऑनलाईन होत असतात. त्यामुळे त्यांचे लॉग- इन आणि पासवर्ड जवळच्या व्यक्तीला किंवा सहचार्‍याला माहित असायला हवेत. ते त्यांना कसे मिळतील याचीही कुठेतरी नोंद करून ठेवावी.
    अन्य महत्वपूर्ण दस्तऐवज- यशिवायही अनेक महत्वपूर्ण कागदपत्र तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबियांना लागू शकतात. त्याची नोंद करून ते कुठे ठेवले आहेत याची माहिती द्यावी. यात घराचे कागदपत्र, जागेचे कागदपत्र, गाडीचे कागदपत्र, पॅनकार्ड , पासपोर्ट , इनकमटॅक्स रिटर्न यांचीही माहिती देणं आवश्यक आहे. यातील काही कागदपत्रे पुरावा म्हणून उपयोगी पडू शकतात.
    आयुष्यभर पै- पै करून जमवलेली संपत्ती वारसांना उपयोगी पडावी म्हणून अशा काही तरतूदी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या पश्चात त्यांना त्या संपत्तीवर दावा सांगण्यासाठी फार कष्ट पडणार नाहीत.

Scroll to Top