हिरो मोटोकॉर्प या आघाडीच्या दुचाकी कंपनीचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांनी १ हजार कोटींहून अधिक बनावट खर्च दाखवून कर वाचवला आहे. तसेच, दिल्लीतील छत्तरपूर येथील फार्म हाऊससाठी १०० कोटी रुपयांचा रोख व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.
प्राप्तीकर विभागाने पवन मुंजाल यांच्या निवासस्थानावर आणि गुडगाव येथील ऑफिसमध्ये २३ मार्च रोजी सर्च ऑपरेशन राबवले होते. यावेळी आर्थिक दस्त आणि कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. कंपनीने करचुकवेगिरी केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाने व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने अध्यक्षांसह इतर प्रवर्तकांच्या दिल्ली एनसीआरसह ४० ठिकाणांची प्राप्तिकर विभागाकडून झडती घेण्यात आली होती.
आर्थिक व्यवहारांची तपासणी, दस्तऐवजांची छाननी व डिजिटल माहितीच्या रुपात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पुरावे जप्त करण्यात आले. कंपनीने करपात्र उत्पन्नात कपात करण्यासाठी एक हजार कोटींहून अधिक रुपयांचे बनावट खर्च दाखवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. याचबरोबर दिल्लीजवळील भागात एका फार्म हाऊसच्या खरेदीमध्ये १०० कोटींहून अधिक मूल्याचा व्यवहार रोख स्वरूपात केल्याचा पुरावाही प्राप्तिकर विभागाला मिळाला आहे.
दरम्यान, प्राप्तीकर विभागाच्या धाडीची बातमी येताच हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या शेअरमध्ये ६.६८ टक्क्यांची घट झाली आहे. हिरो मोटोकॉर्प कंपनी दुचाकी उत्पादनात अग्रगण्य असून यांच्या उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. दुचाकी बनवणारी जगातील सर्वांत मोठी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून हिरोने ओळख मिळवली.