…तर डिमॅट खातं होईल बंद; NSDL, CDSL कडून परिपत्रक जारी

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणे अनिवार्य आहे. मात्र डिमॅट अकाऊंटमध्ये जर तुम्ही केवायसी केली नसेल तर हे अकाऊंट बंद होऊ शकतं. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत तुम्ही केवायसी पूर्ण करून घेऊ शकता. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL) यांनी जारी केलेल्या परिपत्रकात खातेधारकांना त्यांची सहा KYC माहिती द्यावी लागेल, असे म्हटले आहे. ज्यामध्ये त्यांना त्यांचे नाव, पत्ता, पॅन, मोबाईल नंबर, ई- मेल आयडी आणि उत्पन्न श्रेणी या सगळ्यांची माहिती द्यावी लागेल.

१ जून २०२१ पूर्वी उघडलेल्या खात्यांना केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. १ जूननंतर ज्यांनी खाती उघडली असतील त्यांची केवायसी खाते उघडताना पूर्ण झालेली आहेत. या परिपत्रकात असे म्हटले आहे की, सिक्युरिटीज मार्केटमधील व्यवहारांसाठी ग्राहकांच्या वतीने पॅन सादर करण्याची आवश्यकतेमध्ये सुट राहील. मात्र, गुंतवणूकदारांना आयकर वेबसाइटला भेट देऊन पॅन कार्ड व्हेरिफाय करावे लागेल. त्यात जर तुमचा पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल, तर तुमचा पॅन कार्ड वैध मानला जाणार नाही.

सर्व खातेदारांना स्वतंत्र मोबाईल क्रमांक आणि ई – मेल ॲड्रेस द्यावा लागणार आहे. मात्र जर तशीच काही समस्या आली तर आपल्या जवळील व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि ई – मेल देऊ शकते. जवळील व्यक्ती म्हणजे जोडीदार, अवलंबून असलेले पालक किंवा मुले.

एकाच मोबाईल क्रमाकांवर जर एकापेक्षा जास्त डिमॅट खाती असतील तर १५ दिवासंची नोटीस देऊन रिक्वेस्ट फॉर्म भरावा लागणार आहे. असे न केल्यास खाती नॉन – कंप्लायंट्स केली जातील.

Scroll to Top