FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ मध्ये फ्रान्सच्या फुटबॉल संघाने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत इराकचा ३-० असा धुव्वा उडवला आहे. या दिमाखदार विजयासह दोन वेळच्या माजी विजेत्या फ्रान्सने स्पर्धेच्या बाद फेरीत (नॉकआउट स्टेज) आपले स्थान निश्चित केले आहे. २३ जून (मंगळवार) रोजी फिलाडेल्फिया येथील फिलाडेल्फिया स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात फ्रान्सच्या विजयाचा शिल्पकार त्यांचा स्टार फॉरवर्ड कीलियन एम्बाप्पे ठरला. त्याने सामन्यात दोन शानदार गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले, तर उस्मान डेम्बेले याने तिसरा गोल डागत इराकच्या आव्हानातील हवा काढून घेतली.
मुसळधार पाऊस आणि वादळामुळे सामन्यात व्यत्यय-
हा सामना केवळ फ्रान्सच्या उत्कृष्ट खेळासाठीच नाही, तर प्रतिकूल हवामानामुळेही कमालीचा चर्चेत राहिला. पहिल्या सत्राचा (हाफ) खेळ संपल्यानंतर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि चक्रीवादळाची चेतावणी देण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ थांबवावा लागला होता. मुसळधार पावसामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी मैदान कर्मचाऱ्यांना (ग्राउंड स्टाफ) प्रचंड मेहनत घ्यावी लागली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सामना पुन्हा सुरू झाला, तेव्हा फ्रान्सच्या खेळाडूंनी मैदानावर आपली मजबूत पकड कायम ठेवली.
१०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात एम्बाप्पेची चमक-
आपला १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कीलियन एम्बाप्पेने खेळाच्या १४ व्या मिनिटालाच अप्रतिम गोल करून फ्रान्सला १-० अशी सुरुवातीची आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसऱ्या सत्रात, ५४ व्या मिनिटाला इराकचा बचावपटू (डिफेंडर) जैद तहसीन याच्याकडून झालेल्या मोठ्या चुकीचा पुरेपूर फायदा उठवत एम्बाप्पेने सामन्यातील आपला दुसरा वैयक्तिक गोल केला आणि स्कोअर २-० वर पोहोचवला. यानंतर काही वेळातच उस्मान डेम्बेलेने सुरेख मैदानी गोल करत फ्रान्सच्या विजयावर अंतिम शिक्कामोर्तब केले.
ब्राझीलच्या रोनाल्डोला टाकले मागे; मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी-
या सामन्यात दोन गोल करण्यासोबतच कीलियन एम्बाप्पेने विश्वचषकाच्या इतिहासात आपल्या एकूण गोल्सची संख्या १६ वर पोहोचवली आहे. या कामगिरीसह त्याने जर्मनीचे दिग्गज फुटबॉलपटू मिरोस्लाव क्लोज यांच्या विश्वचषकातील १६ गोल्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे, तर ब्राझीलचे महान स्ट्राइकर रोनाल्डो (१५ गोल) यांना मागे टाकले आहे. आता विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत एम्बाप्पेच्या पुढे केवळ अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आहे, ज्याच्या नावावर १८ गोलची नोंद आहे.
२०१८ चा विश्वचषक जिंकणारी आणि २०२२ मध्ये उपविजेतेपद मिळवणारी फ्रान्सची टीम या वर्षीही विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. कीलियन एम्बाप्पे, उस्मान डेम्बेले आणि डेसिरे डोए यांसारख्या आक्रमक खेळाडूंच्या उपस्थितीमुळे फ्रान्सचे आक्रमण अधिक धारदार झाले आहे.
इराकसाठी दुहेरी धक्का; सेनेगलचा पराभव करत नॉर्वेही बाद फेरीत
दुसरीकडे, इराकसाठी हा सामना अत्यंत निराशाजनक ठरला. सामन्याच्या २६ व्या मिनिटालाच इराकचा स्टार स्ट्राइकर अयमेन हुसैन दुखापतग्रस्त (इंज्युअर्ड) झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी अली अल-हमदी याला पर्याय म्हणून मैदानात उतरवण्यात आले होते. इराकचा संघ आपल्या फुटबॉल इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच विश्वचषक खेळत असून, या पराभवानंतर त्यांचा पुढील प्रवास कमालीचा कठीण झाला आहे.
दरम्यान, ग्रुप-I मधून फ्रान्स व्यतिरिक्त नॉर्वेने देखील बाद फेरीत (नॉकआउट राउंड) प्रवेश मिळवला आहे. न्यू जर्सी येथील मेट लाईफ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एका चुरशीच्या सामन्यात नॉर्वेने सेनेगलचा ३-२ असा पराभव केला.










