Home / महाराष्ट्र / Kiran Pawaskar : बाळासाहेबांच्या ‘त्या’ भावनिक आवाहानाला किरण पावसकरांनी म्हटले ‘पाळणाघर’; खासदारांच्या पक्षप्रवेश सोहळ्यातील विधानाने ठाकरे गट प्रचंड संतापला..

Kiran Pawaskar : बाळासाहेबांच्या ‘त्या’ भावनिक आवाहानाला किरण पावसकरांनी म्हटले ‘पाळणाघर’; खासदारांच्या पक्षप्रवेश सोहळ्यातील विधानाने ठाकरे गट प्रचंड संतापला..

Kiran Pawaskar : एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ला मोठे यश आले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला...

By: Team Navakal
Kiran Pawaskar
Social + WhatsApp CTA

Kiran Pawaskar : एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ला मोठे यश आले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांनी अधिकृतपणे सोमवारी मुंबईत आयोजित एका भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिवसेनेत’ (शिंदे गट) प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश आष्टीकर पाटील या सहा प्रमुख नेत्यांनी शिंदे सेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. या मोठ्या राजकीय भूकंपामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. मात्र, या पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान झालेल्या एका वक्तव्यामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

किरण पावसकरांचे वक्तव्य-
या ऐतिहासिक सोहळ्याचे सूत्रसंचालन शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते किरण पावसकर करत होते. आपल्या मार्गदर्शनात पावसकर हे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांमधील कार्यपद्धतीचा फरक स्पष्ट करत होते. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सामान्य कार्यकर्त्यांना कशी जपणारी आहे, हे सांगताना त्यांच्या तोंडून निघालेल्या एका विधानावरून आता वाद पेटला आहे.

किरण पावसकर म्हणाले, “एकीकडे सांगितले जाते की आजपर्यंत तुम्ही मला सांभाळले, आता दुसऱ्याला सांभाळा. त्यांना सांभाळले की पुढे त्यांच्या मुलाला सांभाळा. अरे, हे काय पाळणाघर आहे का? याउलट, इकडे शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे की, जे जे लोक माझ्यासोबत आले आहेत, त्यांची जवाबदारी डॉ. श्रीकांत शिंदेंची आहे; तुम्ही माझ्यासोबत मिळून त्यांना सांभाळायचे आहे. हाच दोन्ही पक्षांमधील मुख्य फरक आहे.”

पावसकर यांच्या या विधानावर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला असून, त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा आरोप केला आहे. “सत्तापिपासू वृत्तीपोटी थेट वंदनीय बाळासाहेबांच्या शब्दांचा आणि भावनांचा असा अवमान करणे कितपत योग्य आहे?” असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या नेत्यांकडून विचारला जात आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे २०१२ मधील ‘ते’ भावनिक आवाहन
या वादाच्या पार्श्वभूमीवर २०१२ सालच्या दसरा मेळाव्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुखांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यामुळे ते शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांनी एका चित्रफितीच्या (व्हिडीओ) माध्यमातून शिवसैनिकांशी अत्यंत भावुक संवाद साधला होता.

त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, “आज मी साफ थकलो आहे, शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलो आहे. बोलताना धाप लागते आणि नीट चालताही येत नाही. मी एकेकाळी मैदान गाजवणारा माणूस होतो, किती दौरे आणि भाषणे केली; पण आता सर्व अवयव थकले आहेत. डॉक्टरांनी माझ्या शरीराची प्रयोगशाळा केली आहे. जर मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल, तर ती विसरून जा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखी घराणेशाही आमच्याकडे नाही. उद्धव आणि आदित्यला मी तुमच्यावर लादलेले नाही, तर तुम्ही स्वतः त्यांचा स्वीकार केला आहे. मी ठाकरे घराण्याची पुढची पिढी तुमच्या हाती सोपवत आहे, यापुढेही त्यांना सांभाळा आणि इमानाला महत्त्व द्या.”

शिवसेनाप्रमुखांचे हे अखेरचे भावनिक आवाहन प्रत्येक शिवसैनिकासाठी अत्यंत संवेदनशील विषय मानला जातो. याच विधानाचा संदर्भ घेत किरण पावसकर यांनी केलेल्या ‘पाळणाघर’ या शब्दप्रयोगामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट समोरासमोर आले असून, आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या