T20 World Cup 2026: श्रीलंकेतील कॅन्डी येथे झालेल्या सुपर-8 फेरीतील अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर 5 धावांनी निसटता विजय मिळवला. मात्र, या विजयानंतरही पाकिस्तानचे टी20 विश्वचषक 2026 मधील आव्हान संपुष्टात आले आहे.
उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला 147 धावांच्या आत रोखणे आवश्यक होते, परंतु यजमान श्रीलंकेने जोरदार लढा दिल्याने पाकिस्तानचे समीकरण बिघडले. या निकालामुळे सरस धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली असून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत त्यांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे.
साहिबजादा फरहानचा ऐतिहासिक पराक्रम
पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले असले तरी, सलामीवीर साहिबजादा फरहानने या सामन्यात सुवर्ण अक्षरात नाव कोरले आहे. फरहानने एकाच टी20 विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा 12 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
2014 च्या विश्वचषकात विराट कोहलीने 6 सामन्यात 319 धावा केल्या होत्या. फरहानने श्रीलंकेविरुद्धच्या डावात 38 धावांचा टप्पा ओलांडताच कोहलीला मागे टाकले. फरहानने या स्पर्धेत आता 320 हून अधिक धावा केल्या आहेत.
एका हंगामात सर्वाधिक धावा (टी20 विश्वचषक)
- साहिबजादा फरहान (पाकिस्तान) – 320* धावा (2026)
- विराट कोहली (भारत) – 319 धावा (2014)
- तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – 317 धावा (2009)
- बाबर आझम (पाकिस्तान) – 303 धावा (2022)
- महेला जयवर्धने (श्रीलंका) – 302 धावा (2010)
विशेष म्हणजे, टी20 विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये सर्व आशियाई फलंदाजांचाच समावेश आहे.
सामन्याचा थोडक्यात आढावा
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना फखर झमान आणि साहिबजादा फरहान यांच्यातील विक्रमी भागीदारीमुळे पाकिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 212 धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी श्रीलंकेनेही चिवट झुंज दिली. श्रीलंकेची अवस्था एकवेळ 4 बाद 94 अशी होती, मात्र तिथून त्यांनी सावरून सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. श्रीलंकेचा संघ 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 207 धावांपर्यंत पोहोचू शकला. पाकिस्तानने सामना जिंकला तरी सेमीफायनल गाठण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीतील चौथा संघ ठरेल.










