शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध 269 धावा करत रचला इतिहास, मोडला विराट कोहलीचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड

Shubman Gill Test Record

Shubman Gill Test Record | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुबमन गिलने (Shubman Gill) इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) दुसऱ्या कसोटी सामन्यात एडबॅस्टन येथे 269 धावांची ऐतिहासिक खेळी करत इतिहास रचला. गिलच्या 269 धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 587 धावांचा डोंगर उभारला. यासोबतच गिलने (Shubman Gill Test Record) अनेक विक्रम देखील मोडले.

त्याने कर्णधार म्हणून विराट कोहलीचा 2019 मधील नाबाद 254 धावांचा विक्रम मोडला आणि कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याशिवाय, ही खेळी आशियाबाहेरील कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे, ज्याने सचिन तेंडुलकरच्या 2004 मधील नाबाद 241 धावांचा विक्रम मागे टाकला.

परदेशातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या

गिलच्या 269 धावा परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजाची तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग (309, मुल्तान, 2004) आणि राहुल द्रविड (270, रावळपिंडी, 2004) यांनी ही कामगिरी केली होती. इंग्लंडमधील कसोटी सामन्यांमध्ये परदेशी फलंदाज म्हणून ही आठवी सर्वोच्च धावसंख्या आहे. गिलच्या आधी एडबॅस्टनवर ग्रॅमी स्मिथ (277, 2003) आणि झहीर अब्बास (274, 1971) यांनी द्विशतके झळकावली होती.

कर्णधार म्हणून विक्रमी कामगिरी

गिलने कर्णधार म्हणून पहिल्या दोन कसोटी सामन्यांत शतके झळकावली, अशी कामगिरी करणारा तो सातवा फलंदाज आहे. यापूर्वी विजय हजारे, सुनील गावस्कर आणि विराट कोहली यांसारख्या भारतीयांनी ही कामगिरी केली आहे. गिल हा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विशतके झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि ख्रिस गेल यांचा समावेश आहे.

इंग्लंडमधील भारतीय फलंदाजांचे द्विशतक

इंग्लंडमधील कसोटी सामन्यांमध्ये यापूर्वी सुनील गावस्कर (221, ओव्हल, 1979) आणि राहुल द्रविड (217, ओव्हल, 2002) या फक्त दोन भारतीयांनी द्विशतके केली होती. गिलची 269 धावांची खेळी भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक आहे आणि भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील सातवी सर्वोच्च धावसंख्या आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने सर्वबाद 587 धावांचा डोंगर उभारला आहे. तर दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडच्या संघाच्या पहिल्या डावात 3 बाद 77 धावा अशी स्थिती होती.