Suryakumar Yadav : टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावल्यानंतरही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचे भवितव्य धोक्यात असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात सूर्यकुमारची ढासळलेली कामगिरी आणि त्याच्या तंदुरुस्तीबाबतचे प्रश्न यामुळे बीसीसीआय (BCCI) आता नवीन नेतृत्वाचा गांभीर्याने विचार करत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
वैयक्तिक कामगिरीतील घसरण आणि बीसीसीआयची नाराजी-
कर्णधार म्हणून सूर्यकुमारने विश्वचषक जिंकून दिला असला, तरी फलंदाज म्हणून त्याच्या सातत्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. माहितीनुसार, बीसीसीआयची ‘थिंक-टँक’ सूर्यकुमारच्या धावांच्या दुष्काळामुळे चिंतेत आहे. विश्वचषकातील त्याची बहुतांश कामगिरी ही दुबळ्या संघांविरुद्ध राहिली, परंतु बाद फेरीतील महत्त्वाच्या सामन्यांत तो आपली छाप पाडू शकला नाही. जुलै २०२४ मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्याच्या फलंदाजीतील ती जुनी आक्रमकता लोप पावत चालल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
दुखापतीचे सावट आणि फिटनेसच्या समस्या-
सूर्यकुमारच्या या खराब फॉर्ममागे त्याच्या उजव्या मनगटाची दुखापत हे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो मनगटावर जाड ‘टेपिंग’ लावून खेळताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या सामन्यांदरम्यानही तो वेदनेत असल्याचे अनेकदा दिसून आले. विश्वचषकातील नेट प्रॅक्टिस दरम्यानही टीम डॉक्टरांना त्याच्या मनगटावर विशेष उपचार करावे लागले होते. सुरुवातीला याकडे सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करण्यात आले, मात्र आता ही दुखापत त्याच्या नैसर्गिक फटकेबाजीवर मर्यादा आणत असल्याचे मानले जात आहे.
नेतृत्व बदलाचे वारे: श्रेयस अय्यर शर्यतीत आघाडीवर-
२०२८ चे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि आगामी टी-२० विश्वचषक डोळ्यांसमोर ठेवून निवड समिती दीर्घकालीन नेतृत्वाचा शोध घेत आहे. या शर्यतीत श्रेयस अय्यर याचे नाव सर्वात प्रबळ मानले जात आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार म्हणून त्याचा अनुभव आणि मधल्या फळीतील त्याचे स्थिर सावरण्याचे कौशल्य निवडकर्त्यांना आकर्षित करत आहे. श्रेयस केवळ संघात पुनरागमनच करणार नाही, तर थेट कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवड समितीसमोर मोठे पेचप्रसंग-
सूर्यकुमार यादवने आगामी दोन वर्षे कर्णधारपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी वाढते वय आणि फिटनेसच्या समस्या त्याच्या आड येऊ शकतात. भारतीय क्रिकेटमध्ये सध्या युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याचे धोरण राबवले जात आहे.











