Lucknow Fire : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील गजबजलेल्या अलिगंज परिसरात एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला अचानक भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चालणाऱ्या कोचिंग सेंटरमधील अनेक विद्यार्थी आतमध्येच अडकले. अचानक पसरलेल्या धुरामुळे आणि आगीच्या ज्वाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी थेट इमारतीवरून उड्या मारल्या, तर काहींनी स्वतःला सुरक्षित ठिकाणी कोंडून घेतले. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
प्राणांतिक थरार: पहिल्या मजल्यावरून विद्यार्थ्याची उडी
आगीची तीव्रता एवढी भीषण होती की, इमारतीतून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग धुराने कोंडले गेले होते. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत एका विद्यार्थ्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. दुर्दैवाने, तो खाली असलेल्या एका लोखंडी ग्रीलवर (लोखंडी कुंपण) जाऊन आदळला आणि ग्रील त्याच्या शरीरात घुसल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी अत्यंत शिताफीने व धैर्याने त्या तरुणाची ग्रीलधून सुटका केली आणि त्याला तात्काळ रस्त्याच्या पलीकडे सुरक्षित ठिकाणी आणून प्रथमोपचार दिले. इतरही काही मुलांनी वरून उड्या मारून आपले प्राण वाचवले, ज्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत.
युद्धपातळीवर बचावकार्य; शेजारील घराची भिंत तोडली
घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाची तब्बल १० वाहने आणि सुमारे १४ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. इमारतीच्या आत अजूनही १२ ते १४ लोक अडकल्याची प्राथमिक माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. इमारतीमध्ये प्रचंड प्रमाणात दाट धूर साचल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आत प्रवेश करणे अशक्य होत होते. यावर तोडगा म्हणून जवानांनी तात्काळ शक्तिशाली एक्झॉस्ट फॅन (धूर बाहेर काढणारे पंखे) बसवले. तसेच, आत अडकलेल्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाने शेजारील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंत तोडून इमारतीमध्ये प्रवेश मिळवला. काही मुलांनी प्रसंगावधान राखून स्वतःला स्वच्छतागृहात (वॉशरुम) कोंडून घेतले होते. अग्निशमन दलाचे जवान सध्या वरच्या मजल्यावरील प्रत्येक खोलीची आणि स्वच्छतागृहाची कसून तपासणी करत आहेत.
इमारतीचे स्वरूप आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या इमारतीची रचना आणि व्यावसायिक स्वरूपाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर पाळीव प्राण्यांचे एक दुकान (पेट शॉप) आणि एक वैद्यकीय क्लिनिक आहे. तर दुसऱ्या मजल्यावर ‘लर्निंग स्पेस’ नावाची एक अभ्यासिका (कोचिंग सेंटर) आणि ३डी आर्ट प्रोडक्शन व गेम ॲसेट आउटसोर्सिंगचे काम करणारा ‘हेड हॉपर स्टुडिओ’ नावाचा ॲनिमेशन स्टुडिओ कार्यरत आहे.
उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक माध्यमांशी बोलताना म्हणाले,”सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सुदैवाने, अद्याप या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. बहुतांश मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून उर्वरित बचावकार्य पुढील काही मिनिटांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. संपूर्ण बचावकार्य आटोपल्यानंतरच या घटनेचा सविस्तर तपशील जाहीर केला जाईल.”
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून तत्काळ निर्देश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सर्व स्तरांवर सर्वोच्च दक्षता बाळगण्याचे आणि मदतकार्यावर सातत्याने वैयक्तिक लक्ष ठेवण्याचे कडक निर्देश दिले आहेत.









