Vaibhav Sooryavanshi Viral Video: भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात डंबुला येथे खेळवला गेलेला सुपर ओव्हरचा सामना कमालीचा थरारक ठरला. मात्र, या अटीतटीच्या लढतीनंतर क्रिकेट मैदानाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले. भारताचा पराभव झाल्यानंतर युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आपला संयम गमावून बसला आणि थेट श्रीलंकन खेळाडूंशी भिडला.
हा संपूर्ण प्रकार सामन्याचा शेवटचा चेंडू टाकल्यानंतर घडला, जो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सामन्यात भारताला शेवटच्या चेंडूवर 8 धावांची गरज असताना श्रीलंकेच्या कुगाथास मथुलनने अचूक यॉर्कर टाकला. त्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरवात केली.
हाच अतिउत्साही जल्लोष किंवा विजयानंतर मिळालेला एखादा टोमणा सूर्यवंशीला आवडला नसल्याचे बोलले जात आहे. यातूनच वाद वाढला आणि रागाने लाल झालेल्या भारतीय सलामीवीराने श्रीलंकेच्या एका खेळाडूला थेट धक्का दिला.
डिकवेलाने मध्यस्थी करत वाद मिटवला; समालोचकांकडून तीव्र नाराजी
मैदानातील वाद आणखी वाढू नये म्हणून विरोधी संघाच्या अनुभवी खेळाडूने यात मध्यस्थी केली. श्रीलंकेच्या निरोशन डिकवेलाने तातडीने पुढे येत सूर्यवंशीला बाजूला केले आणि वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. सामना संपल्यानंतर दोन्ही बाजूचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत असतानाही सूर्यवंशी प्रचंड रागात होता. शेवटी भारतीय संघातील इतर सहकाऱ्यांनी त्याला समजावून पॅव्हेलियनमध्ये परत नेले. एका अटीतटीच्या आणि सुंदर सामन्यानंतर मैदानात असा प्रकार घडणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत समालोचकांनी व्यक्त केले.
कर्णधार तिलक वर्माचाही पंचांशी वाद
या सामन्यात केवळ सूर्यवंशीच नाही, तर भारतीय संघाचा कर्णधार तिलक वर्मा देखील मैदानावर आक्रमक मूडमध्ये दिसला होता. संपूर्ण सामन्यादरम्यान तिलक वर्मा आणि पंचांमध्ये अनेकदा वाद झाले.
- प्रकाशमान स्थितीवर चर्चा: सुपर ओव्हर सुरू होण्यापूर्वी मैदानावरील प्रकाश खेळण्यासाठी योग्य आहे हे पटवून देण्यासाठी तिलक पंचांशी बराच वेळ वाद घालत होता.
- नो-बॉलचा निर्णय: सुपर ओव्हरमध्ये भारताकडून गोलंदाजी केली जात असताना पंचांनी दिलेल्या एका नो-बॉलच्या निर्णयावरही कर्णधार समाधानी नव्हता.
वैभव सूर्यवंशी आणि त्याचा जुना इतिहास
या सामन्यात फलंदाजीतही वैभव सूर्यवंशीला विशेष कमाल करता आली नाही. भारतीय डावा दरम्यान त्याने 14 चेंडूत केवळ 21 धावा केल्या. विशेष म्हणजे, वैभव सूर्यवंशी मैदानात विरोधी खेळाडूंशी भिडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी पार पडलेल्या अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही बाद झाल्यानंतर त्याचा पाकिस्तानच्या अली रझोसोबत मोठा वाद झाला होता. त्याच्या या आक्रमक स्वभावामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हे देखील वाचा – Abhijit Dipke Attack: “10 वेळा कानाखाली मारली तरी…” जयपूरमधील हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया









