MSEDCL Smart Meter : महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना गेल्या दोन दिवसांपासून महावितरणकडून मोबाईलवर एक वेगळाच मेसेज येत आहे. या मेसेजमुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आणि संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. संदेशामध्ये केंद्र सरकारच्या ऑगस्ट 2021 च्या अधिसूचनेचा दाखला देत, पुढील 48 तासांच्या आत जुने वीज मीटर बदलून त्या जागी ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
या मेसेजची भाषा अत्यंत दबावाची आणि धमकीवजा असल्याची तक्रार वीज ग्राहकांनी केली आहे. जुने मीटर बदलले नाही तर वीज पुरवठा खंडित केला जाईल की काय, अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. या वाढत्या वादानंतर आता स्वतः महावितरणने समोर येत यावर अधिकृत खुलासा केला आहे.
MSEDCL Smart Meter : महावितरणने फेटाळले आरोप; नेमके काय आहे स्पष्टीकरण?
ग्राहकांमध्ये सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांवर महावितरणने आपली बाजू मांडली आहे. कंपनीने ग्राहकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. महावितरणच्या दाव्यानुसार, हा मेसेज ग्राहकांना केवळ पूर्वकल्पना आणि माहिती देण्यासाठी पाठवला जात आहे. यामध्ये ग्राहकांवर कोणताही दबाव टाकण्याचा कंपनीचा उद्देश नाही. मेसेजमधील 48 तासांचा अर्थ असा अजिबात नाही की ठराविक वेळेत मीटर न बदलल्यास वीज कापली जाईल किंवा जबरदस्ती केली जाईल. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून ग्राहकांच्या संमतीनेच पुढे नेली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
MSEDCL Smart Meter : स्मार्ट मीटरचे फायदे आणि सवलतीची आकडेवारी
हा नवीन स्मार्ट मीटर पूर्णपणे मोफत बसवून दिला जात असून यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय अगदी अचूक बिलिंग होते, असा दावा महावितरणने केला आहे. ग्राहक मोबाईल अॅपच्या माध्यमातून आपल्या रोजच्या वीज वापराचे नियंत्रणही करू शकतात. या योजनेचे फायदे कंपनीने खालीलप्रमाणे सांगितले आहेत:
५०% ग्राहकांकडून योजनेचा स्वीकार: राज्यातील एकूण वीज ग्राहकांपैकी जवळपास 50 टक्के म्हणजेच 1 कोटी 20 लाख ग्राहकांनी आधीच या स्मार्ट मीटरचा पर्याय स्वीकारला आहे. उर्वरित ग्राहकांच्या घरी टप्प्याटप्प्याने हे मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या अदानी कंपनीसह एकूण चार मोठ्या कंपन्यांना हे स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
७० लाख ग्राहकांना मोठा फायदा: स्मार्ट मीटरचा पर्याय निवडलेल्या ग्राहकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत वीज वापरासाठी विशेष सवलत दिली जाते. आतापर्यंत राज्यातील 70 लाख ग्राहकांनी या सवलत योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या वीज बिलात एकूण 2,235 कोटी रुपयांची मोठी बचत झाली आहे. या फायद्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील 15,907 ग्राहकांचाही समावेश आहे.
हे देखील वाचा – Abhijit Dipke Attack: “10 वेळा कानाखाली मारली तरी…” जयपूरमधील हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया










