\’जतिंगा\’चे रहस्य! जिथे पक्षी आत्महत्या करतात…

आसाममधील जतिंगा हे छोटेसे गाव ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या शेकडो पक्ष्यांनी भरून जाते… हे पक्षी जतिंगाचे आकाश पूर्णपणे व्यापून टाकतात… सकाळी गोल- गोल फेर धरत आकाशात फिरणारे हे पक्ष्यांचे थवे अचानक जमिनीकडे झेप घेतात आणि जतिंगाच्या जंगलात स्वत:चा जीव देतात. ऑक्टोबर उजाडेपर्यंत तर या ठिकाणी पक्ष्यांच्या मृतदेहांचा खच पडलेला असतो. अमाव्यसेच्या रात्री जेव्हा आकाशात चंद्र नसतो, काळाकुट्ट अंधार असतो तेव्हाच हा रहस्यमयी प्रकार घडतो. जतिंगा सोडले तर जगात कुठेही असा प्रकार घडत नाही.

\”जतिंगाचे पक्षी रहस्य\” म्हणून ओळखल्या जाणार्‍या या घटनेने आतापर्यंत जगभरातील शास्त्रज्ञांना चकित केले आहे. हे पक्षी स्थलांतर करणारे किंवा स्थलांतर करताना प्रवासात जतिंगा गाव लागणारे असेही नसतात. हे पक्षी जतिंगा गावाभोवतीच्या १५-२० किमी क्षेत्रफळातीलच इतर जंगलांमध्ये राहणारेच असतात. हे पक्षी इतर पक्षांप्रमाणेच दिवसा उडणारे आणि रात्री घरट्यात झोपणारे असतात. पण अमावस्येच्या रात्री मात्र ते जतिंगात येतात…रिमझिम पाऊस, सगळीकडे पसरलेले धुके, वेगाने वाहणारा वारा अशा परिस्थितीत त्यांना जतिंगाच्या जंगलात विशिष्ट प्रकाश दिसतो आणि ते याच प्रकाशाच्या दिशेने उडत येतात असे म्हणतात.

पण हे सगळे पक्षी अमावस्येच्या रात्री आपल्या घरट्यात झोपलेले का नसतात? त्यांना नेमका कोणता प्रकाश दिसतो? स्वत:च्या गावातून ते जतिंगापर्यंत त्याच रात्री का उडत येतात? जतिंगाला पोहोचल्यावर ते अचनाक जमिनीकडे कसे खेचले जातात? फक्त जतिंगा गावातच पक्षी आत्महत्या का करतात? या प्रश्नांची उत्तरे आजही कोणाकडे नाहीत.

Scroll to Top