माता गांधारी विद्रोह की अंध ममत्त्व

हस्तिनापूरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी, शंभर कौरवांची माता, शकुनीची बहीण, सुबल राजाची कन्या गांधारी हे महाभारतातील एक महत्त्वाचे व्यक्‍तिमत्त्व आहे. माता गांधारीचा प्रवास पाहता कधी ती विद्रोहाचे प्रतिक बनून समोर येते तर कधी आपल्या पुत्रांवर आंधळेपणाने प्रेम करणार्‍या आईच्या ममत्त्वाचे प्रतिबिंब बनते.
गांधार देशाचा राजा सुबल आणि राणी सुधर्मा यांची कन्या गांधारी हिला शंभर पुत्र होण्याचा आशीर्वाद होता. याची माहिती असल्यानेच बहुदा भीष्म पितामहांनी आपला पुत्र धृतराष्ट्रासाठी राजा सुबलकडे संदेश पाठविला. अंध धृतराष्ट्राशी आपल्या मुलीचा विवाह करून देणे योग्य नाही असेच राजाला वाटले असावे. पण हस्तिनापूरच्या बलाढ्य राजाचा प्रस्ताव नाकारला तर काय होईल हे राजाला माहीत होते. म्हणूनच गांधारीने लग्नाला होकार दिला. मात्र तरीही गांधारीला भीष्म पितामहांना सुनवायचे होते. यासाठी विद्रोह म्हणून धृतराष्ट्राशी विवाह झाल्यावर तिने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. काहींच्या मते हा विद्रोह नव्हता तर पतीशी एकरूप होण्यासाठी केलेला महान त्याग होता. गांधारीच्या प्रत्येक कृतीचे असे वेगळे अर्थ निघू शकतात.
कौरव आणि पांडवांचा वाद सुरू झाल्यावरही ती धृतराष्ट्राला सातत्याने सांगत राहिली की, पांडवांना न्याय द्या. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झाल्यावर दुर्योधन जेव्हा आशीर्वाद मागायला आला तेव्हा गांधारीने त्याला ‘विजयी भवं’ असा आशीर्वाद दिला नाही. गांधारी म्हणाली, ‘धर्म जिथे असेल तिथे विजय होऊ दे’ पण युद्धात सर्व पुत्र ठार झाल्यावर दुर्योधनाला वाचविण्यासाठी डोळ्यावरील पट्टी काढून

तिने दुर्योधनाला वज्र शरीर प्रदान केले. युद्ध संपल्यावर कृष्ण तिला भेटायला आला तेव्हा गांधारी संतप्त झाली. कृष्णाने युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न केला नाही याचा तिच्या मनात राग होता. त्यामुळे कृष्णाला तिने शाप दिला की, यादव वंश नष्ट होईल आणि द्वारका बुडेल. गांधारीचा शाप 35 वर्षांनी खरा ठरला. यादव कूळ नष्ट झाले, द्वारका समुद्रात बुडाली.
कुरुक्षेत्राच्या युद्धात सर्व पुत्र गमावल्याचे दुःख उराशी बाळगत धृतराष्ट्र आणि गांधारी पुढची 15 वर्षे हस्तिनापुरात राहिले. त्यानंतर धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे तिघे हस्तिनापूर सोडून हिमालयातील जंगलात गेले. त्या जंगलाला आग लागून तिथेच तिघांचे निधन झाले. गांधारीचे एक मनोगत प्रसिद्ध आहे-
मी अंध नव्हते, मी हे जग बघितले आहे. धर्म, मर्यादा, नितीमत्ता, सर्व थोतांड आहे, निर्णयाच्या क्षणी विवेक व मर्यादा व्यर्थ सिद्ध होतात, आपल्या सर्वांच्या मनात कुठेतरी एक अंध पशू आहे, जो विवेकावर भारी पडतो. मला याच गोष्टीचा तिरस्कार होता म्हणून मी स्वतः डोळ्यांवर पट्टी बांधली. गांधारीच्या प्रत्येक कृतीचे असे वेगवेगळे अर्थ निघू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top