झपाटलेला भानगढ किल्ला

रात्रीचा अंधार गडद होऊ लागला की या किल्ल्यामध्ये घुंगरांचा आवाज घुमतो… बायकांच्या हसण्या-खिदळण्याचे आवाज कानी पडतात असे आसपासचे गावकरी सांगतात. या किल्ल्यात मृत्याम्यांचा वास आहे असेही ते म्हणतात. सूर्य मावळल्यानंतर या किल्ल्याचे दार ओलांडण्याची हिंमत एकही माणूस करत नाही. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर किल्ल्यात प्रवेश करण्यास मनाई आहे. भारतातील मोस्ट हाँटेड फोर्ट म्हणून हा किल्ला ओळखला जातो. जयपूरपासून ११८ किलोमीटर दूर असलेल्या या झपाटलेल्या किल्ल्याचे नाव आहे भानगढ. भानगढचे सगळे वैभव एका शापाने घालवले असे म्हणतात.

राजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि एक शाप…

भानगढची राजकुमारी रत्नावती सौंदर्याची खाण होती. तिच्या सौंदर्याची एक झलक पाहण्यासाठी ती जिथे जाई तिथे लोकांची गर्दी होत असे. याच भानगढमध्ये सिंधू सेवडा नावाचा एक मांत्रिक राहायचा. तंत्र-मंत्र, काळी जादू त्याला अवगत होती. हा सिंधू सेवडा राजकुमारीच्या सौंदर्याचा दिवाणा झाला. त्याचे मन राजकुमारीवर जडले आणि तिला कोणत्याही परिस्थितीत आपले बनवायचे असा निश्चय त्याने केला. एके दिवशी राजकुमारी आपल्या मैत्रिणींसोबत बाजारात जात असल्याचे त्याला समजले. तो देखील तिथे पोहोचला. राजकुमारी आपल्या मैत्रिणींसोबत अत्तर खरेदी करायला एका दुकानात थांबली. सिंधू सेवडाने काळ्या जादूने त्या अत्तराचे रुपांतर प्रेमद्रव्यात केले. राजकुमारीचे नशीब बलवत्तर म्हणून तिला वेळीच
मांत्रिकाचा हा डाव कळला आणि तिने कुपीतील द्रव्य शेजारी असलेल्या एका मोठ्या शिळेवर ओतले.

मात्र झालं अजबच त्या शिळेवर मंतरलेल्या द्रव्याचा परिणाम झाला आणि ती शिळा जादूगाराच्या दिशेने घरंगळत आली. त्याच शिळेखाली चिरडून सिंधू सेवडा जागीच मारला गेला. पण प्रेमद्रव्य शिंपडून राजकुमारीला आपलेसे करण्याचा डाव फसल्याचे समजल्यावर संतापलेल्या सिंधू सेवडाने संपूर्ण भानगढ निर्मनुष्य होईल असा शाप मृत्यूपूर्वी दिला.मांत्रिकाची शापवाणी खरी ठरली. एका मोठ्या लढाईत भानगढचे सगळे राजघराणे संपले, राजकुमारी रत्नावतीचीही हत्या करण्यात आली. संपूर्ण राज्य उध्वस्त झाले. भानगढ कायमचा ओस पडला. आजही इथे राजकुमारी रत्नावतीचा वास आहे असे म्हणतात. आपल्या लाडक्या राणीसोबत हत्या झालेल्या तिच्या दासी रोज रात्री आपल्या राजकुमारीचे मनोरंजन करण्यासाठी किल्ल्यात जमतात आणि त्यांच्या पैंजणाचे आवाज किल्ल्यात ऐकू येतात असे गावकरी सांगतात.

Scroll to Top