‘टूल किट’ नेमके आहे तरी काय?

बंगळुरूमधील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून अटक केली. स्वीडिश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेअर केलेल्या ‘टूल किट’ची निर्मिती आणि प्रसार केल्याचा आरोप दिशावर दिल्ली पोलिसांनी केला. 26 जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या निषेधार्थ दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराला या ‘टूल किट’मुळे हातभार लागल्याचा संशय पोलिसांना आहे. दिशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या वकील आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या निकिता जेकब आणि शंतनू मुलूख यांच्यावरही दिल्ली पोलिसांनी ‘टूल किट’ तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप केला आहे.

एकीकडे, तरुण पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आणि दिशा रवीला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर विविध स्तरातील लोक एकवटले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या देशातील एका तरुणीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्याने अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा हा सुनियोजित प्रयत्न असल्याचे म्हणत अनेकांनी उघडपणे आपली नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, या अटकेच्या समर्थनार्थ अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दिशा रवीच्या अटकेनंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना ‘टूल किट’चा मुद्दा पुन्हा पुन्हा अधोरेखित होताना दिसत आहे. ‘टूल किट’ म्हणजे नेमके काय? त्यात काय असते? ते कशासाठी वापरले जाते? या ‘टूल किट’चा शेतकरी आंदोलनाशी काय संबंध? शेतकरी आंदोलनविषयक ‘टूल किट’ शेअर करणारी ग्रेटा थनबर्ग आणि दिशा रवी कोण आहेत? असे अनेक प्रश्न या सगळ्या चर्चांदरम्यान उपस्थित होऊ लागले.

‘टूल किट’ प्रकरण नेमके आहे तरी काय?

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत या तीन कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीतील सिंघू, गाजीपूर आणि टिकरी सीमांवर शेतकरी नोव्हेंबर 2020 पासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची चर्चा देशभर होत असताना आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कार्यकर्त्यांनी, कलाकारांनी याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य केल्याने जगाचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. पॉप सिंगर रिहाना असो किंवा पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग असो या दोघींनी भारतातील शेतकरी आंदोलनाचे फोटो आणि बातम्या ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत भारतातील आंदोलनावर चर्चा का होत नाही? असा सवाल विचारला होता. ग्रेटा थनबर्ग हिने काही दिवसांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात एक ‘टूल किट’ ट्विट केले. त्यानंतर तिने ते लगेच डिलीट केले आणि पुन्हा एकदा नवे ‘टूल किट’ सोशल मीडियावर शेअर केले. या ‘टूल किट’मुळे सगळा गदारोळ सुरू झाला. प्रजासत्ताक दिनी संतप्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीचा आणि यादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा संबंध या ‘टूल किट’शी जोडण्यात आला. खलिस्तानवादी समर्थक संघटनांनी हे ‘टूल किट’ बनविण्यात मदत केली असल्याचा आरोप होऊ लागला आणि या प्रकरणात बंगळुरूमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला अटक करण्यात आली.

ग्रेटा थनबर्ग, दिशा रवी आहेत तरी कोण?

ग्रेटा थनबर्ग ही स्वीडनमधील 18 वर्षांची पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे. 11 वर्षांची असल्यापासून ग्रेटा ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तामपानवाढ आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्याचे काम करत आहे. स्वीडनच्या संसदेबाहेर ‘पृथ्वी व पर्यावरण वाचवा’ असे आवाहन करत ग्रेटाने सुरू केलेली चळवळ आज जगभरात ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ या नावाने ओळखली जाते. 2019 साली संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण करताना ग्रेटाने जागतिक तापमानवाढीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर राजकीय नेते काहीही करत नसल्याबद्दल जगभरातल्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. ‘टाईम’ मासिकाने ग्रेटाला ‘पर्सन ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला होता.

ग्रेटाच्या ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’चा आदर्श घेत बंगळुरूमधील एका पर्यावरणवादी कार्यकर्तीने भारतात ’फ्रायडे फॉर फ्यूचर’ची सुरुवात केली. ही पर्यावरणवादी कार्यकर्ती म्हणजेच दिशा रवी होय. पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असणाऱ्या विविध चळवळींमध्ये दिशा नेहमीच सहभाग घेत असते. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी, पर्यावरणाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिशा विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन करते, लेख लिहिते.

‘टूल किट’ म्हणजे काय?

जनआंदोलनांच्या बाबतीत ‘टूल कीट’ हा महत्त्वाचा दस्तऐवज असतो. त्याद्वारे जनआंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे सोपे होते. एखाद्या आंदोलनाचा कृती आराखडा असेही आपण त्याला म्हणू शकतो. त्या आंदोलनाचे नियोजन कसे करायचे हे ‘टूल किट’मध्ये लिहिलेले असते. इंटरनेटचा शोध लागण्यापूर्वी आंदोलनांचे नियोजन कागदोपत्री व्हायचे. आंदोलन का करायचे आहे? आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या काय असतील? मागण्यांसाठी एखादा मोर्चा काढायचा असेल तर त्याचा मार्ग काय असणार? त्या मोर्चामध्ये कोणत्या घोषणा दिल्या जातील? कोणाची भाषणे होतील? या सगळ्याचे नियोजन केले जायचे. त्यामुळे आंदोलनाची माहिती देणारी एखादी पुस्तिका असो एखादे पत्रक किंवा पोस्टर या सगळ्यांचा समावेश ‘टूल किट’मध्ये व्हायचा. फक्त त्यावेळी या नियोजनच्या कागदांना ‘टूल किट’ असा शब्द वापरला जायचा नाही इतकेच. तंत्रज्ञानाची क्रांती झाली आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले. आपले विचार, मते मांडण्यासाठी सोशल मीडिया हक्काचे व्यासपीठ बनले आणि आंदोलनाविषयी माहिती देणाऱ्या, आंदोलनाचे नियोजन केलेल्या लेखी कागदांची जागा ऑनलाइन कागदांनी घेतली. गूगल डॉक्युमेंटचा वापर करून ही ‘टूल किट’ तयार होऊ लागली. या टूल किट्समध्ये विविध सोशल मीडिया वेबसाइट्सच्या माध्यमातून आंदोलनाची जाहिरात कशी करावी याची माहिती समाविष्ट होऊ लागली. आंदोलनाच्या माहितीसोबत आता सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधण्यासाठी, समर्थन मिळवण्यासाठी काय शक्कल लढवली पाहिजे, आंदोलन चर्चेत राहावे यासाठी कोणते हॅशटॅग वापरले पाहिजेत, कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीने आंदोलनाविषयी बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे. आंदोलनासंदर्भात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय टाळावे अशी सगळी सविस्तर माहिती या ‘टूल किट’मध्ये लिहिलेली असते.

ग्रेटाने शेअर केलेल्या ‘टूल किट’मध्ये काय होते?

\’भारतात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाविषयी ज्यांना फारसे माहीत नाही अशा सर्वांसाठी हे डॉक्युमेंट आहे. हे वाचल्यानंतर भारतातील शेतकरी आंदोलन समजून घेण्यास आणि या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या परीने काय करता येईल याविषयी निर्णय घेता येतील’, अशा टिपणीने या ‘टूल किट’ची सरुवात होते. भारतातील शेतकऱ्यांची सध्या काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर माहितीही यात देण्यात आली आहे.

‘टूल किट’ बनवणे आक्षेपार्ह आहे का?

‘टूल किट’ हा काही बेकायदेशीर दस्तऐवज नाही. मग दिशाला अटक का करण्यात आली? असा प्रश्न विचारला जात आहे. दिशाला हे ‘टूल किट’ बनवण्यासाठी ’पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’ या खलिस्तान समर्थकांच्या संघटनेने मदत केल्याचा संशय व्यक्त करत दिशाला अटक करण्यात आली आहे. दिशाने एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता ज्या ग्रुपमध्ये निकिता जेकब, शंतनू मुलूख आणि ’पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’च्या सहसंस्थापकाचा सहभाग होता. या सगळ्यांनी मिळून हे ‘टूल किट’ तयार केले आणि दिशाने ’टेलिग्राम’ या ॲपच्या माध्यमातून हे ‘टूल किट’ ग्रेटाला पाठवत शेअर करण्यास सांगितले असेही म्हटले जात आहे.

आंदोलनांमध्ये अशा ‘टूल किट’चा वापर नेहमीच होतो का?

‘टूल किट’चा वापर झालेले हे काही पहिले आंदोलन नाही. जगभरातील विविध जनआंदोलनांमध्ये अशा ‘टूल किट’चा वापर वेगवेगळ्या स्वरूपात केला गेल्याची नोंद आहे. जगभरात आजवर झालेल्या अहिंसक जनचळवळींपैकी तब्बल 300 हून अधिक चळवळींमध्ये आंदोलनकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्या त्या आंदोलनाची विस्तृत माहिती देणारी पुस्तके, पत्रके, पोस्टर यांचा वापर केला गेला असल्याचे अमेरिकेतील स्वार्थमोर कॉलेजने केलेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. 18 ते 19 व्या शतकात ब्रिटनमध्ये गुलामांच्या खरेदी-विक्रीविरोधात झालेले आंदोलन, अमेरिकेत 1960मध्ये नागरी हक्कांसाठी झालेले ’सिट-इन’ आंदोलन किंवा भारतात महात्मा गांधींनी सुरू केलेल्या मीठाच्या सत्याग्रहाचाही या यादीत समावेश आहे.

दिशा रवीला या प्रकरणात अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिशाच्या अटकेच्या विरोधात काँग्रेस तर अटकेच्या समर्थनासाठी भाजप या वादात उतरले आहेत. एकंदरित, ‘टूल किट’ च्या निमित्ताने दिशा रवीला झालेल्या अटकेमुळे आतापर्यंत देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्यांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे.

Scroll to Top