दिनविशेष! कोणताही राजकीय वारसा नसताना ३० वर्ष आमदार राहिलेले रा. सू. गवई

आज ३० ऑक्टोबर. आज रा. सू. गवई यांचा स्मृतिदिवस.
यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९२९ मध्ये झाला.

रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई उर्फ रा. सू. गवई हे वेगळे रसायन होते. कुठलाही राजकीय वारसा नसताना, पैसा नसताना, कुठल्याही भक्कम राजकीय पक्षाचे लेबल नसताना तब्बल ३० वर्षे आमदारकी, १३ महिने लोकसभा, नंतर राज्यसभा, पुढे बिहार व केरळचे राज्यपाल. कुणालाही हेवा वाटावा असे वैभव वाट्याला आल्यानंतर अत्यंत साधा असणारा नेता अशी रा. सू. गवई यांची ओळख होती. १० वर्षे ते सत्तेबाहेर होते. पण गर्दी पूर्वीसारखीच. विदर्भाचा आणि त्यातल्या त्यात अमरावतीचा हा माणूस होता. रा. सू. गवई हे दारापूर गावच्या एका सामान्य कुटुंबातील मुलगा. वडिलांकडे जेमतेम सात एकर शेती होती. मातीचं घर आणि एक म्हैस एवढीच इस्टेट. पण शब्दाला मान होता. बाबासाहेबांचे विचार त्यांना माहीत होते. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या कीर्तनाला ते मुलांना घेऊन जात. स्वत: निरक्षर असले तरी शिक्षणाचे महत्त्व त्यांना ठाऊक होते. तरुणपणीच त्यांनी बाबासाहेबांपासून जगातील सारे लेखक वाचून काढले.

व्हीएमव्ही कॉलेजमध्ये सुरेश भट, मधुकर केचे, जांबुवंत धोटे, अण्णा वैद्य हे त्यांचे मित्र. महारांनी गुरेढोरे वाहून न्यायची नाहीत, मेलेल्या जनावरांचे मांस खायचे नाही. या भूमिकेने रा.सु. गवई प्रथमतः चर्चेत आले. पदवी घेतली. पुढे काय? ‘नोकरी हा आपला मार्ग नाही’ हे त्यांनी आधीच ठरवले होते. घरची परिस्थिती फार चांगली होती अशातला भाग नव्हता. लोकसेवा आयोगाकडून नोकरीचे कॉलही आले होते. मात्र निरक्षर बाप त्या वेळी मुलाच्या पाठीशी उभा राहिला नसता तर आजचे गवई महाराष्ट्राला दिसले नसते. वडिलांनी हिम्मत दिली आणि गवई समाजकार्यात उतरले. याच दरम्यान कमलताई त्यांच्या आयुष्यात आल्या. मात्र सुरुवातीची वर्षे संघर्षात गेली. गवई तेव्हा विमा एजंटचे काम करीत असत. घरी तोंडं पाच. अशा परिस्थितीत कमलताई कंबर कसून पुढे आल्या. शिवणकाम करून त्यांनी संसाराला हातभार लावला. वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले व शिक्षिकेची नोकरी धरली. त्यांनी खूप सोसलं. गवई बाहेर फिरू शकले ते पत्नी कमलताईंच्या मुळे.

१९६४ मध्ये पहिल्यांदा गवई विधान परिषदेवर निवडून आले. चार वर्षानंतर विधान परिषदेचे उपसभापती बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना गॉडफादर असा कुणी नव्हता. दादासाहेब गायकवाड त्यांचे गुरू. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमीहिनांच्या सत्याग्रहातून गवई यांचा उदय झाला. नवबौद्धांना सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी केलेले आंदोलन देशभर गाजले. त्यांच्याकडे वक्तृत्व होते. कर्तृत्व व नेतृत्व त्यांनी सिद्ध केले. राजकारणात त्यांनी खूप तडजोडी केल्या. पण बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहिले. ज्यांनी बाबासाहेबांच्या विचारांशी छेडछाड करून पहिली, घटनेला हात लावू पाहिला तेव्हा गवई त्यांच्यावर तुटून पडले. ते राज्यसभेत असताना घटनेची समीक्षा करण्याचा प्रस्ताव भाजपाचे रामदास अग्रवाल यांनी आणला होता. सभागृहात याला विरोध करताना आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी ‘मी या ठरावाचा माझ्या दातांनी आणि नखांनी विरोध करतो’ या शब्दांत केली होती. जागतिक बौद्धांचे पवित्र स्थळ म्हणून आज दीक्षाभूमीला मान्यता आहे. गायकवाड यांच्या निधनानंतर गवई यांच्याकडे या स्मारक समितीचे नेतृत्व आले. गवईसाहेबांनी राज्य सरकारकडून पैसा आणून स्मारकाच्या कामाला गती दिली. आज नागपूरला येणारा कुठल्याही जातीचा पाहुणा दीक्षाभूमीला गेल्याशिवाय राहात नाही. सर्वधर्म समभावाचे एवढे मोठे स्मारक जगात कुठे नसेल. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे काम म्हणून गवई दीक्षाभूमीचे नाव घेत. गवई यांचे राजकारण समजण्यापलीकडचे होते. राजकारणातील सज्जनशक्तीच्या पाठीशी ते नेहमी उभे राहात आले. मग त्यांनी पक्ष पाहिला नाही. जयंतराव टिळक यांना सभापती होता यावे म्हणून त्यांनी हाती आलेला चान्स सोडून दिला. ए. बी. बर्धन, सुदामकाका देशमुख.. सगळ्याच पक्षात त्यांचे मित्र होते. विश्वासार्हता ही त्यांची मोठी हमी होती. त्या काळात ते काँग्रेसमध्ये गेले असते तर राष्ट्रपतींपर्यंत पोहोचले असते. पण गवई मूल्यांशी एकनिष्ठ राहिले.
रिपब्लिकन पक्ष एक राहावा असे त्यांना खूप वाटे. जनतेलाही ऐक्य हवे होते. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीअगोदर चारही गट एकत्र आले. पण पुढे नेतृत्वाचा वाद पुन्हा उफाळला. एका अजातशत्रू नेत्याला एका गटाचा नेता म्हणून अखेरचा निरोप घ्यावा लागला, यासारखे दुर्दैव कुठले असू शकते? रा. सू. गवई यांचे २५ जुलै २०१५ रोजी निधन झाले.
संकलन.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

Scroll to Top