Hepatitis Risk in Monsoon : पावसाळा सुरू होताच अनेक प्रकारच्या आजारांचे संकट डोके वर काढू लागते. या दिवसांत श्वसनाशी संबंधित त्रासांसोबतच ‘हेपेटायटीस’ सारख्या गंभीर आजाराचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. हेपेटायटीस म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव असलेल्या लिव्हरला सूज येणे.
तसे पाहता या व्हायरसचे अनेक प्रकार आहेत, परंतु ‘हेपेटायटीस A’ आणि ‘हेपेटायटीस E’ हे दोन प्रकार पावसाळ्यात सर्वाधिक सक्रिय असतात. याचे मुख्य कारण म्हणजे हे दोन्ही प्रकार थेट दुषित अन्न आणि अस्वच्छ पाणी यांच्या माध्यमातून शरीरात पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात साचणारे पाणी तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
तुमच्या शरीरात कसा प्रवेश करतो हा धोकादायक व्हायरस?
हा संसर्गजन्य आजार नेमका कसा पसरतो, याचे वैज्ञानिक आणि व्यावहारिक कारण खालीलप्रमाणे आहे:
- पाणी पुरवठ्यात बिघाड: हा व्हायरस प्रामुख्याने बाधित व्यक्तीच्या मलामध्ये आढळतो. पावसाळ्यातील मुसळधार पावसामुळे जेव्हा जमिनीखालील सांडपाण्याची वाहिनी लीक होते किंवा गटारे ओसंडून वाहतात, तेव्हा हे दुषित पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळते.
- लिव्हरवर थेट हल्ला: जेव्हा आपण हे पाणी न उकळता किंवा प्रक्रिया न करता पितो, तेव्हा डोळ्यांना न दिसणारा हा सूक्ष्म व्हायरस आपल्या पचनसंस्थेत प्रवेश करतो आणि तिथून थेट लिव्हरवर हल्ला करतो.
फक्त पिण्याचे पाणीच नाही, तर ‘या’ गोष्टींमुळेही वाढतो संसर्ग
अनेकांना वाटते की फक्त नळाचे दुषित पाणी पिल्यानेच हा आजार होतो, पण तसे नाही. हा संसर्ग इतरही अनेक माध्यमांतून पसरू शकतो:
- कच्चा सॅलड: दुषित पाण्याने धुवलेले कच्चे सॅलड खाल्ल्याने.
- थंड पेये: दुषित पाण्यापासून तयार केलेले बर्फ वापरून बनवलेली कोल्ड ड्रिंक्स पिल्याने.
- स्ट्रीट फूड: रस्त्याच्या कडेला मिळणारी पाणीपुरी, भेल किंवा इतर उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्याने, जेथे पाण्याच्या गुणवत्तेची कोणतीही हमी नसते.
शरीरात आजार पसरल्यास कोणती लक्षणे दिसतात?
जेव्हा हा व्हायरस लिव्हरला संक्रमित करतो, तेव्हा शरीरातील रक्त फिल्टर करण्याची लिव्हरची क्षमता मंदावते. अशा वेळी शरीरात खालील लक्षणे दिसू लागतात:
- प्रचंड थकवा जाणवणे आणि सतत अशक्तपणा येणे.
- पोटात दुखणे, भूक न लागणे आणि उलट्यांचा त्रास होणे.
- या आजाराचे सर्वात मोठे आणि ठळक लक्षण म्हणजे कावीळ (जॉन्डिस) होणे. यामध्ये रुग्णाची त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडतो, तसेच लघवीचा रंग गडद पिवळा होतो.
पावसाळ्यात स्वतःचे रक्षण करण्यासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे उपाय
या आजारापासून दूर राहण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत खालील ३ महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे:
वैयक्तिक स्वच्छता: काहीही खाण्यापूर्वी आणि शौचास जाऊन आल्यानंतर दरवेळी साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुण्याची सवय लावा.
पाण्याची शुद्धता: नेहमी व्यवस्थित उकळलेले किंवा चांगल्या वॉटर प्युरिफायरमधून साफ केलेले पाणीच प्या.
खाण्यापिण्याच्या सवयी: रस्त्याच्या कडेला मिळणारे उघड्यावरील अन्न, आधीच कापून ठेवलेली फळे आणि बर्फ घातलेली पेये पिणे पूर्णपणे टाळा. नेहमी ताजे आणि गरम केलेले अन्नच खा, कारण उष्णतेमुळे हे जंतू मरतात.










