Soham Parekh: एकाचवेळी 5 नोकऱ्यांमधून कोट्यावधीची कमाई, भारतापासून ते अमेरिकेपर्यंत ‘या’ व्यक्तीचीच चर्चा

Soham Parekh

Soham Parekh | भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर सोहम पारेख (Soham Parekh) हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. सोहन पारेखने सिलिकॉन व्हॅलीतील अनेक अमेरिकन स्टार्टअप्समध्ये एकाचवेळी नोकरी केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे त्याने हे आरोप मान्य देखील केले आहे.

मिक्सपॅनेलचे संस्थापक सुहैल दोशी यांनी ‘एक्स’वर पारेख एकाचवेळी अनेक कंपन्यांमध्ये काम करत असल्याचा खुलासा केल्यानंतर याबाबतची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. सोबतच, त्यांनी पारेखला काम कामावर न घेण्याचा इशारा देखील दिला. यानंतर कमीतकमी पाच स्टार्टअप्सनी पारेखवर फसवणुकीचा आरोप केला, तर सोशल मीडियावर याचे मीम्स व्हायरल झाले.

लिंक्डइनचे सीईओ रीड हॉफमन यांनीही या पारेखशी संबंधित मीम सोशल मीडियावर शेअर केले. तर काही नेटकऱ्यांनी पारेखच्या कोडिंग कौशल्याचे कौतुक केले आहे.

सुहैल दोशी यांनी ‘एक्स’वर सांगितले की, पारेख त्यांच्या मिक्सपॅनेल कंपनीत काम करत असताना तीन ते चार इतर स्टार्टअप्समध्ये ‘मूनलाइटिंग’ करत होता. फ्लीट एआय आणि अँटीमेटलच्या सीईओंनीही पारेखने त्यांची फसवणूक केल्याचे सांगितले. यामुळे त्याला या कंपन्यांमधून काढून टाकण्यात आले.

सोहम पारेख कोण आहे?

पारेख याच्या सीव्हीनुसार, तो मुंबई विद्यापीठाचा पदवीधर आणि जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मास्टर पदवी प्राप्त आहे. त्याने डायनॅमो एआय, युनियन एआय, सिंथेसिया आणि अॅलन एआय सारख्या कंपन्यांमध्ये काम केल्याचा दावा केला आहे. मात्र, यापैकी किती माहिती खरी आणि किती खोटी आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. त्याच्या कोडिंग कौशल्यामुळे त्याला अनेक कंपन्यांमध्ये प्रवेश मिळाला, परंतु त्याने एकाचवेळी अनेक नोकऱ्या केल्याने त्याची विश्वासार्हता प्रश्नांकित झाली आहे.

‘एक्स’वर पारेखच्या या प्रकरणानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. OpenAI आणि मेटा एआय यांच्यातील ‘टॅलेंट वॉर’लाही या मीम्समध्ये ओढले गेले. लिंक्डइनचे सीईओ रीड हॉफमन यांनीही यावर गमतीशीर टिप्पणी केली. सोशल मीडियावर काहीजण पारेखला “मल्टीटास्किंग मास्टर” आणि “सिलिकॉन व्हॅलीचा सुपरस्टार” असे उपहासाने संबोधत आहेत.