12th Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा 89.79 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे कोकण विभागाने सर्वोच्च निकाल देत आपली परंपरा कायम राखली आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मुलींनी यंदाही मुलांपेक्षा चांगला निकाल लावून बाजी मारली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यंदा राज्याचा निकाल 89.79 टक्के लागला. मागील वर्षीच्या 91.88 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 2.09 टक्क्यांची घट झाली आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआय शाखांसाठी एकूण 14,44,713 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,33,058 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आणि त्यातील 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 89.79 इतकी आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये 50,876 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 50,346 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेआणि 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 36.44 इतकी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये 8,446 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,367 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 7,579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 90.58 आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभागाने 94.14 टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी 84.14 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.15 असून, मुलांची 86.80 टक्के आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 6.35 टक्क्यांनी अधिक आहे. यंदा परीक्षेतील 153 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
घरून परीक्षा देणारे 80 टक्के उत्तीर्ण
शाळेत न जाता थेट परिक्षा देणार्या खाजगी विद्यार्थ्यांमध्ये 37,559 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 36,941 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 80.21 आहे. अलीकडे पाल्याला शाळेत न पाठवता घरीच त्याचा अभ्यास घेण्याकडे कल वाढतो आहे.











