Ashok Kharat Case : शिर्डी येथील बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी त्याला पुन्हा एकदा राहाता दिवाणी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, न्यायालय त्याच्या कोठडीत वाढ करणार की त्याला न्यायालयीन कोठडी सुनावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या चार दिवसांपासून शिर्डी पोलीस आणि विशेष तपास पथकाद्वारे (SIT) खरातची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, तपासादरम्यान अशोक खरात पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहार आणि जमिनीच्या कागदपत्रांबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्याने बगल दिली असून, अनेक महत्त्वाच्या बाबींवर मौन बाळगले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीने जेव्हा या प्रकरणातील साक्षीदारांना खरातच्या समोर बसवून चौकशी केली, तेव्हा खरात चांगलाच संतापला. आपले सर्व व्यवहार कायदेशीर असल्याचा दावा करत, साक्षीदार आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवत असल्याचा आरोप त्याने केला आहे.
या संपूर्ण चौकशीत खरातने आपली पत्नी आणि या प्रकरणातील सहआरोपी कल्पना खरात हिच्या ठावठिकाण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. कल्पना खरात गेल्या ४० दिवसांपासून फरार असून, तिचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. नाशिकमधील निदा खान हिला महिनाभरात बेड्या ठोकणाऱ्या पोलिसांपुढे कल्पना खरातला शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दुसरीकडे, अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्याविरुद्ध महिला अत्याचार आणि फसवणुकीचे एकूण नऊ गुन्हे दाखल असून, एसआयटी पुढील आठवड्यात या संदर्भात दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल करण्याची तयारी करत आहे. अटकेनंतर ६० दिवसांच्या आत न्यायालयात सबळ पुराव्यांसह हे दोषारोपपत्र सादर करण्याचा पोलिसांचा मानस आहे. आतापर्यंतचा तपास, जप्त केलेली कागदपत्रे आणि नोंदवण्यात आलेले साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे हे आरोपपत्र तयार केले जात आहे.









