Home / मनोरंजन / Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte : तन्वी कोलते बिग बॉस मराठी ६ ची नवीन राणी! ! बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर कोरले नाव, तर ‘या’ सदस्याला मिळाले उपविजेतेपद!

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte : तन्वी कोलते बिग बॉस मराठी ६ ची नवीन राणी! ! बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर कोरले नाव, तर ‘या’ सदस्याला मिळाले उपविजेतेपद!

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte : मराठी मनोरंजन विश्वात गेल्या शंभर दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या...

By: Team Navakal
Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte
Social + WhatsApp CTA

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte : मराठी मनोरंजन विश्वात गेल्या शंभर दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा दिमाखदार समारोप झाला असून, अटीतटीच्या लढतीत तन्वी कोलते हिने विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. सौंदर्यासोबतच आपल्या अष्टपैलू खेळाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या तन्वीला या पर्वाची ‘विजेती’ म्हणून घोषित करण्यात आले. अंतिम फेरीत विशाल कोटीयन, राकेश बापट, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद यांसारख्या तगड्या स्पर्धकांचे आव्हान तन्वीसमोर होते; मात्र जनसामान्यांच्या उदंड प्रतिसादाने आणि सर्वाधिक मतांच्या जोरावर तिने मानाची ट्रॉफी उंचावली. या स्पर्धेत राकेश बापट याने द्वितीय क्रमांक पटकावला.

‘तन्वी बोलते, सबको कोलते’: स्वप्नवत प्रवास-
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तन्वीच्या वागण्यावरून आणि स्पष्टवक्तेपणावरून अनेकांनी तिची चेष्टा केली होती. “तन्वी कोलते, खूप बोलते” अशी तिची ओळख निर्माण झाली होती. मात्र, जसा काळ सरकला, तसा तिचा खेळ अधिक प्रगल्भ होत गेला. कठीण प्रसंगात दाखवलेली जिद्द आणि प्रत्येक कार्यात (टास्क) दिलेली झुंज यामुळे तिला चाहत्यांनी ‘क्वीन ऑफ बिग बॉस’ आणि ‘टास्क क्वीन’ अशा पदव्या बहाल केल्या. शंभर दिवसांनंतर तिच्याबद्दलची धारणा बदलून “तन्वी बोलते, सबको कोलते” असा नवा नारा चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला.

पुरस्कारांची लयलूट आणि रितेश देशमुख यांची विशेष भेट-
विजेतेपदाचा बहुमान मिळाल्यानंतर तन्वीवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. तिला ‘बिग बॉस मराठी’ची झळाळती ट्रॉफी आणि १५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्त, पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्याकडून १० लाख रुपयांचे भेट कुपन (Voucher) आणि तुनवाल ई-मोटर्सकडून एक ई-बाईक भेट म्हणून देण्यात आली. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे, कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या टीमतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली एक सुंदर फ्रेम तन्वीला सन्मानपूर्वक भेट दिली.

भावूक प्रतिक्रिया: “ब्रँड होऊन बाहेर पडतेय!”-
विजयानंतर आपली भावना व्यक्त करताना तन्वी भावूक झाली होती. ती म्हणाली, “आज शंभर दिवसांच्या तपश्चर्येनंतर ही ट्रॉफी माझ्या हातात आली आहे. मालिका आणि चित्रपटांतील पात्रांमुळे लोक मला ओळखत होते, पण स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करण्यासाठी मला ‘बिग बॉस’च्या व्यासपीठावर यायचे होते. आज मी इथून केवळ तन्वी कोलते म्हणून जात नसून, एक ‘ब्रँड’ म्हणून बाहेर पडत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या स्वप्नांना पाठबळ देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते.”

कारकीर्द आणि पार्श्वभूमी-
मुळची कोकणची कन्या असलेल्या तन्वी कोलतेने अनेक सौंदर्य स्पर्धांमधून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मधील सिंचनाच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मात्र, या प्रतिष्ठित शोमध्ये सहभागी होण्यासाठी तिने चालू मालिकेतून निरोप घेतला होता. तिचा हा धाडसी निर्णय अखेर सार्थ ठरला असून, आता ‘बिग बॉस मराठी ६ ची विजेती’ ही तिची नवी आणि कायमस्वरूपी ओळख बनली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या