Home / महाराष्ट्र / Maharashtra Rain : कोकणच्या घाटमाथ्यावर पावसाचं तांडव सुरू; पहिल्याच पावसात घटप्रभा नदीने धारण केलं रौद्ररुप

Maharashtra Rain : कोकणच्या घाटमाथ्यावर पावसाचं तांडव सुरू; पहिल्याच पावसात घटप्रभा नदीने धारण केलं रौद्ररुप

Maharashtra Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याच्या घाटमाथ्यावर वसलेल्या ऐतिहासिक चौकुळ गावात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे घटप्रभा नदीचे पात्र दुथडी भरून...

By: Team Navakal
Maharashtra Rain
Social + WhatsApp CTA

Maharashtra Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याच्या घाटमाथ्यावर वसलेल्या ऐतिहासिक चौकुळ गावात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे घटप्रभा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या या प्रचंड पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पहिल्याच पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पाण्याचा वेग आणि प्रवाह अत्यंत तीव्र झाला आहे.

भारतीय हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. घाटमाथ्यावरील दुर्गम आणि उंचावरील भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी आधीच वर्तवली होती. हा अंदाज तंतोतंत खरा ठरवत चौकुळ परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली, तर सिंधुदुर्गच्या उर्वरित मैदानी भागात सध्या ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दीर्घकाळाच्या उकाड्यानंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या या पावसामुळे शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांना आणि उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीच्या पूर्वमशागतीच्या कामांना आता वेग येणार असल्याने बळीराजा राजा कमालीचा आनंदी दिसत आहे.

दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी राज्यातील एकूण २५ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व पुणे, आणि विदर्भातील अकोला या प्रमुख जिल्ह्यांसह एकूण २५ जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ६ जून ते ९ जून या कालावधीत संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. या काळात ताशी ३0 ते ४0 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, काही संवेदनशील भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह तीव्र पावसाची शक्यता आहे. सद्यस्थितीत मान्सूनचे आगमन झाले असले, तरी त्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापण्यासाठी आगामी १५ जूनपर्यंतची प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती वेधशाळेने दिली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या