Home / महाराष्ट्र / Jitendra Awhad : महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मालिकेवर संक्रांत आली, तरी मोठे स्टार्स गप्प का?”; जितेंद्र आव्हाडांनी मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गजांना उघडपणे सुनावले खडे बोल!

Jitendra Awhad : महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मालिकेवर संक्रांत आली, तरी मोठे स्टार्स गप्प का?”; जितेंद्र आव्हाडांनी मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गजांना उघडपणे सुनावले खडे बोल!

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड...

By: Team Navakal
Jitendra Awhad 
Social + WhatsApp CTA

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठी मनोरंजन विश्वातील नामांकित कलाकारांवर आणि एकंदरीत चित्रपटसृष्टीवर अत्यंत तीव्र शब्दांत कडाडून टीका केली. ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका बंद पडण्याच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी बाळगलेल्या मौनाचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांची सामाजिक जबाबदारी आणि त्यांची सद्यस्थितीतील निष्क्रियता यावर त्यांनी जाहीर सभेत बोट ठेवले.

जितेंद्र आव्हाड आपल्या भाषणात म्हणाले की, “ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे नेहमीच त्यांच्या खास शैलीत आणि डामडौलात बोलत असतात. महाराष्ट्रातील मी पाहिलेल्या थोर विचारवंतांपैकी ते एक आहेत, यात शंका नाही. परंतु, जेव्हा समाजातील गंभीर विषयांवर भूमिका घेण्याचे प्रसंग येतात, तेव्हा हे नाना पाटेकर नेमके कुठे असतात?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी केवळ नाना पाटेकरांवरच नव्हे, तर मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावरही निशाणा साधला. महापुरुषांच्या जीवनावरील मालिका बंद होत असताना या प्रसिद्ध मराठी कलाकारांनी पुढे येऊन ठामपणे बोलायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कलाकारांच्या वाढत्या लाचारीवर प्रहार करताना आव्हाड यांनी भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील चित्रपटसृष्टीची तुलना केली. देशात आणीबाणी लागू झाली असताना जेव्हा ‘आंधी’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा देवानंद आणि कैफी आझमी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात उभे राहण्याचे धाडस दाखवले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. सर्वसामान्य जनता आणि चित्रपटसृष्टीचे नाते अत्यंत घट्ट असते. मात्र, आजची चित्रपटसृष्टी कमालीची लाचार झाली असून, तिची अवस्था केवळ “आंबा चोखून खाल्ला की कापून खाल्ला?” अशा निरर्थक आणि चाटूगिरी करणाऱ्या प्रश्नांपुरतीच मर्यादित उरली आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. सध्याच्या मनोरंजनसृष्टीतील कोणाकडूनही आपल्याला अपेक्षा उरलेली नाही, असे सांगताना त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे कौतुक केले. दीपिकाने एका संवेदनशील मुद्द्यावर बोलण्याचे धाडस दाखवले होते, त्यानंतर तिला कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागले हे आपण सर्वांनी पाहिले आहे, असे आव्हाड म्हणाले.

या जाहीर सोहळ्यात जितेंद्र आव्हाड यांनी ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेची निर्मिती करणाऱ्या खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. या मालिकेसाठी त्यांनी अमोल कोल्हे यांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या थोर विचारांमुळे आणि संघर्षामुळेच आज आपल्या समाजात महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. अशा थोर महापुरुषांची भूमिका जर अमोल कोल्हे पडद्यावर साकारत असतील आणि सरकार जर त्यांच्या कामात खोडा घालत असेल, तर ही जनता सत्तेत असलेल्या सरकारला आडवे केल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी सरकारला दिला. जितेंद्र आव्हाड यांनी मराठी मनोरंजन विश्वाला सुनावलेल्या या खड्या बोलांनंतर आता चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या