Home / मनोरंजन / Deool Band 2 : महाराष्ट्रात ‘श्री स्वामी समर्थ’ नामाची अभूतपूर्व लाट! पहिल्याच दिवशी ‘देऊळ बंद २’ बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल; रिलीजच्या दिवशीच कमावले तब्बल ‘इतके’ कोटी!

Deool Band 2 : महाराष्ट्रात ‘श्री स्वामी समर्थ’ नामाची अभूतपूर्व लाट! पहिल्याच दिवशी ‘देऊळ बंद २’ बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल; रिलीजच्या दिवशीच कमावले तब्बल ‘इतके’ कोटी!

Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये २०१३ साली ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने श्रद्धा आणि विज्ञानाचा अनोखा संगम साधत प्रेक्षकांच्या मनावर...

By: Team Navakal
Deool Band 2
Social + WhatsApp CTA

Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये २०१३ साली ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने श्रद्धा आणि विज्ञानाचा अनोखा संगम साधत प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातले होते. आता तब्बल ११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या चित्रपटाचा सिक्वेल ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

ब्रह्ममुहूर्तावर प्रदर्शनाचा धाडसी प्रयोग यशस्वी
सामान्यतः चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्याची परंपरा असताना, ‘देऊळ बंद २’च्या टीमने एक वेगळा प्रयोग केला. गुरुवारी पहाटे ६ वाजता, गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्ताचे औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. दक्षिण भारतीय चित्रपटांच्या धर्तीवर केलेला हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला असून, पहाटेच्या शोसाठीही प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर अभूतपूर्व गर्दी केली होती. पुणे, मुंबई, नाशिक, विदर्भ आणि मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात हा चित्रपट ‘ब्लॉकबस्टर’ ठरला आहे.

पहिल्या दिवसाची विक्रमी कमाई
‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरातील १,१७५ शोजच्या माध्यमातून २.४५ कोटी रुपयांचे निव्वळ (Net) संकलन केले आहे. तर भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शनचा आकडा २.८९ कोटींवर जाऊन पोहोचला आहे. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये एकाच दिवशी २५ शो हाऊसफुल्ल होणे, ही मराठी चित्रपटाच्या इतिहासातील एक दुर्मिळ आणि विक्रमी घटना मानली जात आहे. मुंबईतील भांडुप, कल्याण, अंधेरी आणि ठाणे या मराठीबहुल भागांतही तिकीट खिडक्यांवर मोठी झुंबड पाहायला मिळाली.

प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि मोहन जोशींचा अभिनय
या चित्रपटाचे संपूर्ण यश त्याचे लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या कल्पकतेला जाते. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी पटकथेमुळे हा सिक्वेल अधिक परिणामकारक ठरला आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत जीव ओतला असून, त्यांच्या संवादफेकीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. ‘वटवृक्ष इंटरटेनमेंट’च्या माध्यमातून कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ‘देऊळ बंद २’चा बोलबाला सुरू झाला आहे. चित्रपटातील संगीत, छायांकन आणि विशेषतः भावनिक प्रसंगांचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्म ‘बुक माय शो’वरही तिकिटांसाठी मोठी मागणी असून, हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपट ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या