FDA Raids : भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषध विक्रेत्यांविरोधात सातत्याने कडक पावले उचलणारे अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आता अधिक आक्रमक झाले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने आता महिलांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या (ब्युटी प्रॉडक्ट्स) बाजारपेठेवर आपला मोर्चा वळवला आहे. बेकायदेशीर आणि मानवी शरीराला घातक ठरणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण महाराष्ट्रात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या राज्यव्यापी कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी छापे टाकून बनावट, भेसळयुक्त आणि दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या प्रसाधनांचा सुमारे ३४.६१ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून यामुळे बनावट सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
या धडक मोहिमेची पहिली मोठी कारवाई सातारा जिल्ह्यातील कराड येथे करण्यात आली. कराड परिसरामध्ये ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचे मोठ्या प्रमाणावर साठवणूक आणि वितरण होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार एफडीएच्या पथकाने तेथे छापा टाकून तब्बल २९.४५ लाख रुपयांचा अवैध साठा जप्त केला. या तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना धक्कादायक बाबी आढळून आल्या. अनेक नामांकित ब्रँड्सच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या या उत्पादनांवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि उत्पादक कंपनीची कोणतीही कायदेशीर माहिती उपलब्ध नव्हती, तर काही वस्तूंवर केवळ परवाना क्रमांक लिहून उत्पादकाचे नाव लपवण्यात आले होते. हा सर्व प्रकार ग्राहकांची फसवणूक करणारा असल्याने हा साठा तातडीने जप्त करण्यात आला.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये कारवाई; सुडौल शरीराचा दावा करणारी घातक उत्पादने जप्त
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येही या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला ग्राहकांचे आणि घाऊक खरेदीचे मुख्य केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये एफडीएने अचानक तपासणी सुरू केली. या कारवाईत भ्रामक आणि शास्त्रीय आधार नसलेले दावे करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचा १.२० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. महिलांमध्ये खरेदीसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या या बाजारपेठेत चक्क शरीराचा आकार सुडौल करण्याचा, स्नायू बळकट करण्याचा किंवा त्वचेचा रंग उजळण्याचा दावा करणारी बनावट उत्पादने उघडपणे विकली जात होती.
क्रॉफर्ड मार्केटमधील विविध दुकानांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये प्रामुख्याने स्नायू आणि स्तनांचा आकार वाढवण्याचा दावा करणारे ‘ब्रेस्ट एन्लार्जमेंट’ प्रॉडक्ट्स, पार्श्वभाग सुडौल करण्याचा दावा करणारे ‘बट एन्हान्समेंट’ क्रीम आणि शरीरातील अतिरीक्त चरबी अत्यंत जलद गतीने कमी करण्याचा दावा करणारे ‘फॅट बर्नर’ यांसारखी भ्रामक उत्पादने मोठ्या प्रमाणावर आढळून आली. सौंदर्य आणि सुदृढ शरीराची ओढ असलेल्या महिलांना आकर्षित करण्यासाठी या वस्तूंचा बेकायदेशीर बाजार मांडण्यात आला होता. या उत्पादनांच्या दर्जाची आणि वैज्ञानिक मान्यतेची कोणतीही अधिकृत पूर्तता न करता त्यांची विक्री केली जात असल्याने ही उत्पादने महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि त्वचाविकारांना निमंत्रण देणारी असल्याचा निष्कर्ष एफडीएने काढला आहे.
कांदिवलीत विनापरवाना कारखान्यावर छापा; ‘औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियमा’ंतर्गत गुन्हा दाखल-
मुंबईच्या उपनगरातही या बनावट उत्पादनांचे जाळे पसरल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील कांदिवली पश्चिम भागात एका नामांकित संस्थेवर आणि कारखान्यावर एफडीएने छापा टाकला. या ठिकाणी कोणत्याही कायदेशीर परवान्याशिवाय (लायसन्स) मोठ्या प्रमाणावर सौंदर्यप्रसाधने आणि काही विशिष्ट औषधांचे बेकायदेशीर उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले. प्रशासनाने या कारवाईत विनापरवाना तयार करण्यात आलेली प्रसाधने, त्यासाठी लागणारा रासायनिक कच्चा माल आणि यंत्रसामग्रीसह सुमारे ३.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारखाना सील केला आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी ही छापेमारी केली आहे, त्या सर्व संबंधित दुकानदार, उत्पादक आणि वितरकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्ती आणि संस्थांवर ‘औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४०’ (Drugs and Cosmetics Act, 1940) मधील विविध कडक कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.









