Indu mill – मुंबईत दादरच्या इंदू मिलमध्ये ( Indu mill ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जात आहे. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ असणार आहे.
या पुतळ्याची प्रतिकृती तयार केली असून त्यावरून आता पुतळा बनवला जात आहे. मात्र स्मारकासाठी केलेली पुतळ्याची प्रतिकृती ही पूर्णपणे सदोष आहे असा अत्यंत गंभीर आरोप गेले अनेक महिने होत आहे. ज्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची छायाचित्रे अनिल सुतार यांनी दाखवली त्यातील चेहरा अजिबात बाबासाहेबांसारखा वाटत नाही. याशिवाय इतरही गंभीर उणिवा दिसत आहेत.
याबाबत आंतरराष्ट्रीय इंदू मिल संघर्ष समितीने अनेकवेळा आवाज उठवला, निवेदने दिली, पण सरकारने त्यांच्या आक्षेपांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. अर्थात आंबेडकरी नेत्यांनी या प्रतिकृतीला आक्षेप घेतलेला नाही. सरकारने पुतळ्याच्या प्रतिकृतीचा अधिकृत फोटो जाहीर करण्याची मागणी संघर्ष समिती सदस्यांनी केली आहे.
राज्य शासनाने 19 मार्च 2013 रोजी दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिल क्र. 6 मधील सुमारे 4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर 20 एप्रिल 2013 च्या आदेशानुसार या स्मारकाच्या विकासासंदर्भात तपशील जारी केला.
यानुसार याठिकाणी 350 फूट उंच असा डॉ. आंबेडकर यांचा भव्य कांस्य पुतळा आणि 100 फूट चबुतरा उभारला जाणार असल्याचे जाहीर झाले. याठिकाणी बौद्ध वास्तुशैलीतील घुमट, चक्राकार उतरणी, ध्यानधारणा केंद्र, संशोधन केंद्र, 1000 आसन व्यवस्था असलेला हॉल, ग्रंथालय, स्मरणिका विक्री केंद्र, उपहारगृह, बाग, वाहनतळ आदी सुविधा असणार आहे. पुतळ्याचे काम प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आले. मात्र त्यांचे वय 100 असल्याने ही जबाबदारी त्यांचे पुत्र अनिल सुतार हे पार पाडणार आहेत.
संघर्ष समिती सदस्य रमेश जाधव यांनी सांगितले की, 14 एप्रिल 2025 रोजी अनिल सुतार यांनी या पुतळ्याची 25 फूटांची नमुना प्रतिकृती संघर्ष समिती सदस्यांना दाखवली.
मात्र ही प्रतिकृती सदोष असल्याने मुख्य समन्वयक म्हणून अक्षय आंबेडकर, रमेश जाधव, प्रतीक कांबळे, विलास रुपवते, अशोक कांबळे यांच्या नेतृत्वातील इंदू मिल संघर्ष समितीशी जोडलेल्या 111 संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रतिकृती सदोष असल्याने त्यात सुधारणा करूनच मग पुतळा उभारणी सुरू करा, अशी त्यांनी मागणी केली.

यासंदर्भात संघर्ष समितीने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी वारंवार संपर्क करून सरकारकडे यासंदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांच्या हाती निराशा पडली.
बाबासाहेबांच्या पुतळ्यातील त्रुटीबद्दल शिरसाट यांच्याशी पत्र व्यवहारही झाला. या विषयाची प्रत महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय, सांस्कृतिक, गृहनिर्माण व नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्र्यांसह स्थानिक खासदार व आमदार यांनाही दिली आहे. तर केंद्र स्तरावर राष्ट्रपती, पंतप्रधान, सामाजिक न्याय, सांस्कृतिक, शहरी विकास, पर्यटन या विभागांनाही पाठवली आहे.
या पत्रात नमूद केले की, इंदू मिल येथे उभारत असलेल्या स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी या बाबासाहेबांच्या पुतळ्याची प्रतिकृती संघर्ष समितीला दाखवली. ही प्रतिकृती बाबासाहेबांच्या प्रतिमेशी सुसंगत नाही. यामध्ये गंभीर चुका आढळल्या.
समिती सदस्यांच्या निरीक्षणानुसार पुतळ्याचा चेहरा बाबासाहेबांसारखा अजिबात दिसत नाही, पुतळ्याचा उजवा हात अवघडल्यासारखा दिसतो, पुतळ्याचा कोट ढगळ आहे, पँट अत्यंत सैल व सुरकुतलेली आहे, डोक्याच्या मागील बाजूस केशरचना बाबासाहेबांच्या शैलीशी विसंगत आहे, पुतळ्याच्या पाठीस पोक दिसते आणि शारीरिक बांधा चुकीचा भासतो आहे. या आक्षेपांचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून प्रतिक्रिया अपेक्षित होती. मात्र आजवर सरकारकडून या आक्षेपांना उत्तर आलेले नाही.
संघर्ष समितीचे म्हणणे आहे की शिल्पकार राम सुतार यांचे वय 100 वर्षे असून त्यांचे पुत्र डॉ. अनिल सुतार हे गाझियाबाद येथे हा पुतळा तयार करीत आहेत. मात्र त्यांचा शिल्पकार म्हणून अधिकृत पुरावा शासनाकडे नाही, प्रतिकृतीत सुधारणा करून तो तज्ञ समितीकडून म्हणजे जे.जे. आर्ट्स व आंबेडकरी चळवळीतील शिल्पकार यांच्याकडून तपासावा, त्यांच्या अंतिम मंजुरीनंतरच उभारणी करावी.
याशिवाय समितीची अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभाग, एमएमआरडीए, संबंधित शिल्पकार व संघर्ष समिती यांची तत्काळ संयुक्त बैठक व्हावी, बाबासाहेबांचे अधिकृत सरकारी छायाचित्र व मंत्रालयाशेजारी असलेला विद्यमान पुतळा यांच्या आधारेच अंतिम शिल्प पूर्ण करावे, पुतळ्याचे काम पारदर्शक ठेवण्याची शासनाने दक्षता घ्यावी.
रमेश जाधव यांनी सांगितले की, 14 एप्रिलनंतर स्थानिक उबाठाचे खासदार अनिल देसाई यांनी यासंबंधी एमएमआरडीएची बैठक घेतली. यावेळी एमएमआरडीएने प्रतिकृतीत बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सूचना आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेकांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केले. मात्र त्यांच्याकडून बैठकीबाबत कोणतीही वेळ मिळाली नाही. त्यानंतरही संघर्ष समितीने एमएमआरडीएला याबाबत आतापर्यंत 10 पत्रे दिली आहेत. सरकारने या स्मारकासाठी दोन समित्या नेमल्या होत्या. मात्र या समित्यांच्या बैठकांना इंदू मिल संघर्ष समिती सदस्यांना बोलावलेले नाही.
याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी स्पष्ट केले की, सरकार कंत्राटदाराला रक्कम देते. त्यामुळे काम आपल्याला हवे तसे झाले पाहिजे. यावेळी त्यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट या प्रश्नाबाबत सक्रिय काम करत नसल्याची तक्रारही केली.

त्यावेळी त्यांनी संघर्ष समितीतील 111 संघटनांचे शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी विलास रुपवते, प्रतीक कांबळे, रमेश जाधव उपस्थित होते. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाकडून बैठक झाली. मात्र त्यानंतर मंत्री शिरसाट यांच्या नेतृत्वातील सामाजिक न्याय विभागाकडून शिष्टमंडळ दिल्लीला नेण्याबाबत कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही.
स्मारकाच्या बुटाचा भाग
आज मुंबईत येणार
इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात उभारण्यात येणार्या पुतळ्याचा बूट (पादत्राण) उद्या दुपारी 12 वाजताच्या सुमारास मुंबईतील मुलुंड चेक नाका येथे दाखल होणार आहे.
त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मुलुंड चेकनाका ते दादर स्मारक या प्रवास मार्गावर त्याचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे असे निवेदन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय बावधनकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
हे देखील वाचा –
महाराष्ट्राने सविस्तर अहवाल पाठवावा; मोदी सरकार तत्काळ मदत करतील ! अमित शहांचे आश्वासन