Home / महाराष्ट्र / Jitendra Awad : तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटींची ‘सुपारी’; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप

Jitendra Awad : तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटींची ‘सुपारी’; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप

Jitendra Awad : अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून आपल्या धडक कारवायांमुळे देशभरात चर्चेत आलेले आयएएस...

By: Team Navakal
Jitendra Awad
Social + WhatsApp CTA

Jitendra Awad : अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून आपल्या धडक कारवायांमुळे देशभरात चर्चेत आलेले आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सुरक्षेचा आणि बदलीचा प्रश्न आता राज्याच्या विधीमंडळात चांगलाच गाजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक गौप्यस्फोट केला. तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागातून बदली करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबी आणि बड्या मेडिकल कंपन्यांनी एकत्र येऊन तब्बल २५० कोटी रुपयांचा निधी गोळा केला असून त्यांची मोठी ‘सुपारी’ घेण्यात आल्याचा थेट आरोप आव्हाड यांनी केला आहे. या गंभीर विषयामुळे संपूर्ण सभागृह हादरले असून या संपूर्ण प्रकरणाची नावानिशी माहिती आपण पुढील आठवड्यात सोमवारी जाहीर करणार असल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

भेसळ आणि भ्रष्टाचाराची साखळी; मंत्र्यांवर दबावाचा आरोप
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दुरवस्थेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. राज्यात अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील भेसळीमुळे कॅन्सरसारख्या (कर्करोग) जीवघेण्या आजारांचे प्रमाण चिंताजनक गतीने वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. संशयास्पद मालाची तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा (लॅब्स) अद्ययावत नसून, अनेकदा प्रयोगशाळेत पाठवलेले नमुने जाणीवपूर्वक ‘फेल’ केले जातात आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ‘सेटलमेंट’ केली जाते, अशी विदारक स्थिती त्यांनी मांडली. पालघरमध्ये उतरणारा प्रतिबंधित गुटखा संपूर्ण महाराष्ट्रात कसा फिरतो? असा सवाल उपस्थित करत त्यांनी अधिकारी आणि माफियांच्या अभद्र युतीवर बोट ठेवले. तसेच, आश्रमशाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या तांदळातही भेसळ होत असल्याचे त्यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे अत्यंत साधे आणि सरळ माणूस असून, या संपूर्ण भ्रष्ट साखळीचा त्यांच्यावर इतका प्रचंड दबाव आहे की, त्या दबावामुळे कदाचित त्यांचा राजीनामाही झाला असता, असे म्हणत हा विभाग मंत्र्यांऐवजी दुसरीच एखादी अदृश्य शक्ती चालवत असल्याचा खळबळजनक आरोप आव्हाड यांनी केला.

मुंढेंच्या जीवाला धोका; सर्वपक्षीय नेत्यांकडून संरक्षणाची आणि दीर्घ कार्यकाळाची मागणी
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बाजारातील बनावट आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून बेकायदेशीर कारवायांना मोठा अटकाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी मुंढे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. आमदार अर्जुन खोतकर यांनी सभागृहात सांगितले की, प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे तुकाराम मुंढे यांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे; त्यामुळे शासनाने त्यांना तातडीने चोख पोलीस संरक्षण पुरवले पाहिजे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना, “तुकाराम मुंढे यांच्या नावातील ‘टी’ (T) हा आता ‘टायगर’चा (वाघाचा) ‘टी’ झाला आहे,” असे गौरवोद्गार काढले. अशा धडाडीच्या अधिकाऱ्याला किमान तीन वर्षे त्याच पदावर ठेवून काम करू दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या सर्व चर्चेला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, एफडीए विभागाकडून सध्या अतिशय दर्जेदार आणि कडक कारवाई सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा शासनाचा कोणताही विचार नसून त्यांच्या बदलीचा प्रश्नच उद्भवत नाही. विभागातील पायाभूत सुविधांच्या कमतरतेची कबुली देत, अधिकाऱ्यांसाठी पुरेशा गाड्या आणि सुसज्ज कार्यालये नसल्याची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी शासन लवकरच गाड्यांची आणि आवश्यक निधीची व्यवस्था करेल, असे मंत्री झिरवाळ म्हणाले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या