Knife attack in Mahi- चर्चगेट-विरार लोकलमध्ये 21 वर्षीय मयंक लोहार याची किरकोळ वादातून चाकूने हत्येची घटना ताजी असतानाच मुंबईत आणखी दोन धक्कादायक हल्ल्याचे प्रकार आता उघडकीस आले आहेत. यामुळे सततच्या तणावामुळे मुंबईकरांचा संयम सुटत चालला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत माहिम रेल्वे स्थानकाबाहेर किरकोळ वादातून एका 35 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला, तर सीएसएमटी परिसरात एका तरुणाने कोयता घेऊन नागरिकांना धमकावल्याची घटना घडली. या घटना आधी घडलेल्या असल्या तरी त्या आता उघडकीस आल्या आहेत.
माहिम रेल्वे स्थानकाबाहेर किरकोळ धक्काबुक्कीच्या वादातून 35 वर्षीय नवीन प्रसन्नावर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. नवीन हा माहिम पश्चिम भागात असलेल्या पितांबर लेन भागात राहायला आहे. तो गुरुवारी 25 जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लोअर परळ येथील ऑफिसमधून काम आटोपून घरी परतत होता. माहिम स्टेशनबाहेर जात असताना त्याचा एका अनोळखी व्यक्तीला धक्का लागला. यानंतर त्या व्यक्तीने मोबाईल खाली पडून तुटल्याचे सांगत नवीनकडे नुकसानभरपाईची मागणी केली. नवीनने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने संतापून चाकू काढून नवीनवर वार केले. या हल्ल्यात नवीनच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या आणि तो रस्त्यावर कोसळला. त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार आहे. सध्या त्याचा तपास सुरू आहे. याबाबत नवीनचा भाऊ सचिन म्हणाला की, नवीन हा लोअर परळ भागातील जाहिरात, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम करत आहे. जीवघेण्या हल्ल्यानंतर नवीन जवळपास 15 तास बेशुद्ध होता.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेर हल्ल्याची दुसरी घटना घडली. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने हातात कोयता घेऊन स्वतःची पत्नी व इतर नागरिकांना धमकावले. या प्रकरणात पोलिसांनी वकार अन्वर शेख (22) याला ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वकार हा हातात कोयता घेऊन मोठ्याने ओरडत होता आणि येणार्या-जाणार्या नागरिकांकडे धावत होता. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला मागून घेरत त्याच्या हातातील कोयता हिसकावून घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत समोर आले की, वकार हा आपल्या पत्नीसोबत फिरायला आला होता. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर संतापाच्या भरात त्याने बॅगेतून कोयता काढून पत्नी तसेच इतर नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनांमुळे मुंबईतील कायदा-सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
या सलग घटनांनंतर रेल्वे पोलीस सतर्क झाले असून सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या आहेत. लोकल प्रवाशांच्या बॅगांची प्रत्यक्ष तपासणी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीमुळे स्कॅनर वापरणे कठीण असल्याने सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली अधिकार्यांच्या उपस्थितीत बॅगांची तपासणी केली जाणार आहे. कामगार आणि कारागिरांनी धारदार हत्यारे किंवा साधने ट्रेनमध्ये न नेता कामाच्या ठिकाणीच ठेवावीत, असे आवाहन पोलिसांनी केले.










